शिराळा : सागाव (ता. शिराळा) येथे मोलॅसिस वाहतूक करणारा टँकर व दुचाकीच्या धडकेत सावित्री मानसिंग पाटील (वय 65) या वृद्धेचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचे पती मानसिंग हंबीर पाटील (वय 75) हे गंभीर जखमी झाले. ही घटना मंगळवार, दि. 30 रोजी सायंकाळी घडली. याबाबत उत्तम आनंदराव पाटील यांनी शिराळा पोलिसात फिर्याद दिली आहे.
सावित्री पाटील व मानसिंग पाटील हे दुचाकीवरून (क्र. एमएच 10 बीके 6351) सरूड रस्त्यावर असणाऱ्या शेताकडे निघाले होते. पाठीमागून येणाऱ्या टँकरची (क्र. एमएच 46 बीएम 9666) धडक बसली. त्यामध्ये सावित्री या खाली पडल्या. अंगावरून टँकरचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये पती मानसिंग पाटील हे रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला पडले. दोन्ही पाय व छातीस मार लागल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातानंतर टँकर चालक व क्लीनर दोघेही पसार झाले. पोलिसांच्या प्राथमिक तपासात टँकर चालक अल्ताफ मेहबूब मुलाणी (वय 51, रा. रेठरे धरण ता. वाळवा) असल्याचे निष्पन्न झाले आहे.