Sangli Rotavirus Vaccine Shortage Pudhari
सांगली

Rotavirus Vaccine Sangli | सांगली जिल्ह्यात रोटाव्हायरस लसीचा दोन महिन्यांपासून तुटवडा; तातडीने पुरवठा करण्याची काँग्रेसची मागणी

विटा ग्रामीण रुग्णालयात गेल्या २५ दिवसांपासून ही लस उपलब्ध नसल्याच्या तक्रारी पालकांनी काँग्रेसकडे केल्या

पुढारी वृत्तसेवा

Sangli Rotavirus Vaccine Shortage

विटा : सांगली जिल्ह्यात लहान मुलांना दिली जाणारी रोटाव्हायरस प्रतिबंधक लस गेल्या दोन महिन्यांपासून उपलब्ध नसल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या पार्श्वभूमीवर तातडीने लसीचा पुरवठा सुरू करावा, अशी मागणी खानापूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष चंद्रकांत चव्हाण यांनी केली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रमांतर्गत बालकांना रोटाव्हायरस लस मोफत दिली जाते. राज्यातील सर्व सरकारी व ग्रामीण रुग्णालयांमध्ये ही लस उपलब्ध करून दिली जाते. मात्र, विटा ग्रामीण रुग्णालयात गेल्या २५ दिवसांपासून ही लस उपलब्ध नसल्याच्या तक्रारी पालकांनी काँग्रेसकडे केल्या होत्या.

या तक्रारींची दखल घेत चंद्रकांत चव्हाण यांनी बुधवारी विटा ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली. तेव्हा रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी लस उपलब्ध नसल्याची माहिती दिली. तसेच लस नेमकी कधी उपलब्ध होईल, याबाबतही स्पष्ट माहिती देण्यास त्यांनी असमर्थता दर्शविली.

यानंतर चव्हाण यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. त्यावेळी डॉ. कदम यांनी केवळ २५ दिवस नव्हे, तर संपूर्ण सांगली जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून रोटाव्हायरस लसीचा तुटवडा असल्याचे सांगितले. राज्याच्या आरोग्य विभागाकडे लसीची मागणी करण्यात आली असून, केंद्राकडून लस प्राप्त झाल्यानंतरच पुरवठा करता येणार असल्याचे राज्य स्तरावरून कळविण्यात आल्याने अडचण निर्माण झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

रोटाव्हायरस हा अत्यंत संसर्गजन्य विषाणू असून तो प्रामुख्याने दूषित अन्न, पाणी तसेच मलमूत्राच्या संपर्कातून पसरतो. या संसर्गामुळे पाच वर्षांखालील बालकांना तीव्र अतिसार, उलट्या आणि शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होण्याचा धोका असतो. त्यामुळे बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ही लस अत्यंत महत्त्वाची मानली जाते. शासनामार्फत सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रमांतर्गत 'रोटावॅक' किंवा 'रोटासील' ही तोंडावाटे देण्यात येणारी लस उपलब्ध करून दिली जाते.

सध्या लसीचा पुरवठा खंडित झाल्याने खानापूर तालुक्यासह जिल्ह्यातील पालकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. दर आठवड्याला सांगली जिल्ह्याचा आढावा घेणाऱ्या पालकमंत्र्यांनी या गंभीर प्रश्नाकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी चंद्रकांत चव्हाण यांनी केली. लहान मुलांच्या आरोग्याशी संबंधित अत्यावश्यक लसीचा पुरवठा खंडित होणे ही अत्यंत गंभीर बाब असून, हा बालकांच्या आरोग्याशी आणि भविष्याशी खेळ असल्याचा आरोपही त्यांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT