सांगली : वाढीव घरपट्टीला स्थगिती मिळेपर्यंत महापालिकेशी असहकार राहील. नवीन घरपट्टी बिले भरायची नाहीत. घरपट्टीवर बहिष्कार टाकायचा, असा निर्धार मंगळवारी घरपट्टी विरोधी कृती समितीने मोर्चासमोर केला. त्याला उपस्थित सर्व नागरिक, व्यापारी, लहान-मोठे व्यवसायिक, उद्योजक यांनी उस्फूर्तपणे होकार दिला. वाढीव घरपट्टीबाबत नागरिकांच्या भावनांकडे दुर्लक्ष केल्यावरून पालकमंत्री, आमदार, खासदार तसेच भाजप नगरसेवक व प्रशासनाचा निषेध करण्यात आला.
वाढीव घरपट्टी विरोधात घरपट्टी विरोधी कृती समितीने मंगळवारी महापालिका क्षेत्र बंद व महापालिकेवर मोर्चाची हाक दिली होती. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. येथील स्टेशन चौकातून मोर्चास सुरुवात झाली. राजवाडा चौक, पटेल चौक, गणपती पेठ, गणपती मंदिर, कापड पेठ, हरभट रोडमार्गे महापालिकेसमोरून शाळा नंबर एकच्या समोर मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत झाले. वाढीव घरपट्टी विरोधी कृती समितीचे निमंत्रक हणमंत पवार यांनी निवेदन वाचून दाखवले.
व्यापारी एकता असोसिएशनचे अध्यक्ष समीर शहा म्हणाले, वाढीव घरपट्टीविरोधी आंदोलनाच्या निमित्ताने व्यापारी, नागरिक, उद्योजक त्यांचे ऐतिहासिक एकजूट झाली आहे. वाढीव घरपट्टी लागू करणाऱ्या महापालिका प्रशासनाचा धिक्कार आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील काल (सोमवार) सांगलीत होते. मोर्चा व बंदच्या पार्श्वभूमीवर ते कृती समितीची चर्चा करतील, असे वाटत होते. पण दुर्दैव हे की त्यांनी कोणालाही बोलावून घेऊन चर्चा केली नाही. दिल्लीतील आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला, त्याचप्रमाणे सांगलीतही चाललंय. नागरिक, उद्योजक, व्यापारी घरपट्टी भरणार नाहीत.
दिगंबर जाधव म्हणाले, घरपट्टीचे समर्थन करणाऱ्या आमदार सुधीर गाडगीळ यांचा निषेध आहे. यापुढेही समर्थन केले तर कृती समितीने त्यांचे वाहन आडवावे. सतीश साखळकर म्हणाले, वाढीव घरपट्टीमुळे महापालिका क्षेत्रातील नागरिकांत असंतोष आहे. मात्र आमदार, खासदार यांना नागरिकांच्या भावना कळत नाहीत. महापालिका क्षेत्रातील ९० टक्के नागरिकांना घरपट्टी मान्य आहे, असे अकलेचे तारे तोडणाऱ्यांना आजचा मोर्चा आणि कडकडीत बंदने नागरिकांचा रोष दाखवून दिला आहे. याप्रश्नी आमदार, खासदार, नगरसेवक तसेच पदाधिकारी, अधिकारी यांच्या घरासमोर झोपमोड आंदोलन केले जाईल.
मोर्चाचे नेतृत्व सतीश साखळकर, हणमंत पवार, वि. द. बर्वे, समीर शहा, ॲड. अजित सूर्यवंशी, रवींद्र वळवडे यांनी केले. यावेळी शंभूराज काटकर, सुरेश टेंगले, तानाजी सावंत, नितीन चौगुले, विकास मगदूम, बाळासाहेब बंडगर, डॉ. संजय पाटील, सुदर्शन माने, शैलेश पवार, प्रा. पद्माकर जगदाळे, ज्योती आदाटे, नितीन चव्हाण, विनायक सिंहासने, गजानन मिरजे, रेखा पाटील, रत्नाकर नांगरे, अजित सूर्यवंशी, विराज कोकणे, शशिकांत गायकवाड, आनंद देसाई, प्रमोद सूर्यवंशी, प्रसाद रिसवडे, जयपाल चौगुले, सुजित हांडे, संतोष पाटील, विक्रम सावर्डेकर, तसेच नागरिक, व्यापारी, उद्योजक मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी होते.