Sangali News 
सांगली

Sangali News | सांगली कारागृहातून पळालेला कैदी उदगावात ‘फिल्मी स्टाईल’ने पकडला अर्ध्या तासाचा थरार

Sangali News | शेवटी मिरज आणि जयसिंगपूर पोलिसांनी मिळून त्याला बेड्या ठोकत मिरजकडे रवाना केले आणि सुटकेचा श्वास सोडला.

पुढारी वृत्तसेवा

Sangali News

कोल्हापूर परिसरात सोमवारी दुपारी अगदी चित्रपटात दाखवतात तसा थरार उडाला. सांगली कारागृहातून पळून गेलेला कैदी अजय दाविद भोसले हा उदगाव बसस्थानक परिसरात दिसताच पोलिसांच्या दोन टीम्सनी एकत्रित कारवाई करत त्याला पकडले. जवळपास अर्धा तास चाललेल्या या पाठलागामुळे बसस्थानक परिसरात प्रचंड गर्दी झाली आणि लोकांनी प्रत्यक्ष डोळ्यांनी हा थरार पाहिला. शेवटी मिरज आणि जयसिंगपूर पोलिसांनी मिळून त्याला बेड्या ठोकत मिरजकडे रवाना केले आणि सुटकेचा श्वास सोडला.

सांगली कारागृहात खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेला भोसले हा गेल्या काही दिवसांपासून फरार होता. सांगली जेलच्या तटावरून खंदकात उडी मारून त्याने पळ काढल्याचे उघड झाल्यानंतर सांगली पोलिसांनी त्याच्यावर स्वतंत्र गुन्हा दाखल केला होता. त्याच्या शोधासाठी मिरज आणि सांगली पोलिसांना सतर्क केले होते. तपास करत असताना सोमवारी सकाळी त्याच्या उदगाव बसस्थानक परिसरात दिसल्याची माहिती मिरज पोलिसांना मिळाली. त्यानंतर तात्काळ पथक तेथे दाखल झाले.

पोलिसांनी परिसरात गस्त वाढवली, परंतु भोसले हा सतत जागा बदलण्याचा आणि पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न करत होता. पोलिसांनी जवळ येताच तो पुन्हा पळण्याच्या तयारीत होता. याच वेळी जयसिंगपूर पोलिसांचे पथकही तेथे मदतीसाठी पोहोचले आणि दोन्ही टीम्सने त्याला चारही बाजूंनी घेरले. काही क्षण पोलिस आणि आरोपी यांच्यात धावपळ सुरू राहिली. लोक जेवढे पाहू शकत होते तेवढे कुतूहलाने संपूर्ण घटना पाहत होते.

अखेरीस पोलिसांनी त्याला आवरून जमिनीवर पाडले आणि कडक सुरक्षा घालून हातात बेड्या ठोकल्या. मोठ्या प्रयत्नानंतर भोसले याला अखेर ताब्यात घेतल्याने मिरज व जयसिंगपूर पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला. आरोपीला पुढील चौकशीसाठी मिरज पोलिस ठाण्यात नेण्यात आले.

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, तुरुंग व्यवस्थेच्या सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एका आरोपीने जेलच्या तटावरून उडी मारून पळ काढल्याने ही घटना गंभीर धरली जात आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT