तासगाव : मणेराजुरी (ता. तासगाव) येथील कोड्याचे माळ येथील हॉटेल डॉल्फिनवर सुरू असलेल्या वेश्या अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून दोन पीडित महिलांची सुटका केली. याप्रकरणी चारजणांविरोधात तासगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अंमलदार सुरेश गणपती भोसले (वय 41) यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.
या बेकायदेशीर वेश्या व्यवसायप्रकरणी सागर पोपट भोसले (वय 23, रा. मणेराजुरी), कैलास बाबासाो सूर्यवंशी (वय 28, रा. जाधववाडी, ता. कवठेमहांकाळ), ओंकार गणेश सकटे (वय 26, रा. डोर्ली, ता. जत) व सुनील लालासाो चव्हाण (वय 34, रा. मणेराजुरी) या संशयितांचा गुन्हा दाखल झालेल्यात समावेश आहे. यावेळी दोन पीडिता आढळून आल्या. चार संशयितांसह दोन पीडित मुलींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी, मणेराजुरी येथील कोड्याचे माळ येथील हॉटेल डॉल्फिन येथे बेकायदेशीरपणे छुपा वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिस हवालदार सुरेश भोसले यांना गोपनीय बातमीदाराकडून मिळाली होती. त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक दीपक पाटील यांच्या पथकाने सोमवारी पहाटे या हॉटेलवर छापा मारला असता, त्या ठिकाणी संशयित सागर भोसले व कैलास सूर्यवंशी हे दोघेजण संगनमत करून पीडित दोन मुलींच्या मदतीने त्यांच्या ताब्यातील खोलीत वेश्या व्यवसाय चालवीत असल्याचे आढळून आले. त्या व्यवसायातून मिळणारे पैसे स्वत:कडे ठेवून आपला उदरनिर्वाह चालवीत असल्याचे आढळून आले. तसेच संशयित ओंकार सकटे व सुनील चव्हाण हे ग्राहक म्हणून वेश्यागमन करण्यासाठी आले असल्याचे आढळून आले.
पोलिस पथकाने चार संशयितांसह दोन पीडित मुलींना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी चार संशयितांवर अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलिस निरीक्षक दीपक पाटील, अमित परीट, अमर सूर्यवंशी, सुरेश भोसले, सतीश साठे, अजित सूर्यवंशी, तानाजी शिंदे, महिला पोलिस गीतांजली पाटील यांचा पथकात समावेश होता. अधिक तपास पोलिस करीत आहेत.