Illegal Liquor  file photo
सांगली

Sangli News: पोलिस झाले जागे, हातभट्टीवर पडू लागले छापे

पुण्यातील घटनेनंतर करावी लागली कारवाई; माणसे मेल्यानंतरच यंत्रणा हलणार का?

पुढारी वृत्तसेवा

Sangli News

सांगली : पुणे येथे विषारी दारूमुळे लोकांचा बळी गेल्याच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील पोलिस यंत्रणा जागी झाली. त्यांनी आतापर्यंत झापेचे अर्थपूर्ण सोंग घेतले होते. आता ते हातभट्टी दारूअड्ड्यावर छापे टाकत आहेत. जत तालुक्यात माणिकनाळ, धुळकरवाडी आणि बालगाव येथे पोलिसांनी छापा टाकून दारू अड्डे उद्ध्वस्त केले. मिरज तालुक्यात एरंडोली, कवलापूर येथे दारू विक्रेत्यांवर कारवाई केली. आटपाडी तालुक्यात निंबवडे येथे कारवाई करून माल जप्त केला.

जत तालुक्यात तीन ठिकाणी कारवाई

जत : तालुक्यातील माणिकनाळ, धुळकरवाडी आणि बालगाव येथे अवैध दारू निर्मिती व विक्रीविरोधात उमदी पोलिसांनी शनिवारी (दि. ३० मे) रात्री मोठा साठा जप्त केला. माणिकनाळ येथे धनसिंग मेघू लमाणी (वय ७०) यांच्या घराशेजारी पोलिसांनी छापा टाकून हातभट्टी दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे २०० लिटर उग्र वासाचे रसायन जप्त केले. या रसायनाची किंमत सुमारे ८ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

धुळकरवाडी येथे मल्लाप्पा यल्लाप्पा येळगेर (वय ३६) यांच्या ताब्यातून विक्रीसाठी ठेवलेली ११५ लिटर शिंदी दारू जप्त करण्यात आली. या दारूची किंमत ५ हजार ७५० रुपये असून, बेकायदेशीर दारू विक्रीप्रकरणी त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली. बालगाव येथे निर्मला चंद्राम बगली (वय ५०) यांच्या ताब्यातून देशी संत्रा दारूच्या १८० मिलिच्या २० सीलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या. या दारूची अंदाजे किंमत २ हजार रुपये आहे.

कवलापूर, एरंडोलीत कारवाई

सांगली : कवलापूर (ता. मिरज) येथे हातभट्टी दारू विकणाऱ्यावर कारवाई करण्यात आली. अनिल विलास नाईक (वय ५३, रा. कवलापूर) असे त्याचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून ७५० रुपये किंमतीची हातभट्टी दारू जप्त करण्यात आली. सांगली ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली.

एरंडोलीमध्ये दारू विक्रेत्यावर कारवाई

एरंडोली (ता. मिरज) येथे दारूची विनापरवाना विक्री करणाऱ्या एकावर करण्यात आली. कारवाई शुभम तानाजी जाधव (वय २९, रा. एरंडोली) असे त्याचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून २१०० रुपये किंमतीची देशी दारू जप्त करण्यात आली. तो एंरडोली ते खंडेराजुरी रस्त्यावर विनापरवाना दारूची विक्री करीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर मिरज ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली.

निंबवडेत हातभट्टीवर छापा

आटपाडी : तालुक्यातील निंबवडे गावच्या हद्दीत नासकर तलावाच्या काठावर सुरू असलेल्या बेकायदा हातभट्टी दारू निर्मितीच्या अड्ड्यावर आटपाडी पोलिसांनी शनिवारी सायंकाळी छापा टाकून सुमारे २९ हजार ५९८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांची चाहूल लागताच संबंधित महिला पसार झाल्या. याप्रकरणी दत्तात्रय रमेश कांबळे (पोलिस कॉन्स्टेबल, आटपाडी पोलिस ठाणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार नीलाबाई सुखदेव बुधावले, नगीना अंबादास बुधावले, मीना बाळू बुधावले आणि बाळाबाई अशोक बुधावले (सर्व रा. निंबवडे, ता. आटपाडी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छाप्यात ८१० लिटर कच्चे रसायन, पत्र्याचे ५४ डबे, चार रबरी पाईप, दारू काढण्याची भांडी, चुलीसाठी वापरलेली लाकडे व अन्य साहित्य असा एकूण २९ हजार ५९८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपी महिला बेकायदा हातभट्टी लावून दारू तयार करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT