विटा : लघुउद्योगांना थेट सरकारी टेंडर प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मिळावी या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या जीएम पोर्टल (गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस)चा गैरवापर केल्याचा आरोप खानापूर तालुक्यातील पळशी येथील ग्रामसेवकावर करण्यात आला आहे. ग्रामसेवकाने पत्नी व कुटुंबीयांच्या नावाने नोंदणी करून विविध ग्रामपंचायतींना साहित्य पुरवठा केल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते सूरज अशोक निकम यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे लेखी स्वरूपात केली आहे.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात निकम यांनी म्हटले आहे की, खानापूर तालुक्यातील पळशी ग्रामपंचायतीमध्ये सध्या सुनिल अशोक गुरव हे ग्रामसेवक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून जीएम पोर्टलवर पत्नी तसेच कुटुंबीयांच्या नावाने नोंदणी केली असून त्या माध्यमातून विविध ग्रामपंचायतींना साहित्य पुरवठा केल्याचा आरोप आहे. या प्रक्रियेत निकृष्ट दर्जाचे साहित्य पुरवून शासनाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे.
तसेच सुनिल गुरव हे कार्यालयीन वेळेत ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित राहत नसून, त्याच वेळेत जीएम पोर्टलद्वारे साहित्य खरेदी-विक्रीच्या व्यवहारात व्यस्त असल्याचेही निकम यांनी म्हटले आहे. गुरव यांनी ज्या-ज्या ग्रामपंचायतींमध्ये काम केले आहे त्या सर्व ठिकाणच्या दप्तरी नोंदींची तपासणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय त्यांच्या उद्योगाचे वर्कशॉप हातनूर (ता. खानापूर) तसेच कुपवाड औद्योगिक वसाहतीमध्ये असल्याचा उल्लेख तक्रारीत आहे. गुरव हे गेली ११ वर्षे पळशी येथे नियमबाह्य पद्धतीने कार्यरत असल्याचा आरोप करत, त्यांना राजकीय किंवा प्रशासकीय पातळीवर कोणाचे पाठबळ आहे याचीही चौकशी करावी, अशी मागणी निकम यांनी केली आहे. संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर योग्य कारवाई करावी, असेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.