Fake OBC Certificates Issues
विटा: राज्यातील सत्तेत असलेल्या भाजपला आता आपल्याच शासकीय अधिकाऱ्यांवर विश्वास उडाला आहे काय? असा प्रश्न उपस्थित करणा ऱ्या गोष्टी घडत आहेत. बोगस ओबीसी दाखले देणाऱ्या जिल्हास्तरीय जात पडताळणी समितीच्या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा, अशी मागणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मागणीनंतर आता ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संग्राम माने यांनीही केली आहे.
याबाबत माने म्हणाले की, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत कुणबी जातीचे खोटे दाखले सादर करून मूळ ओबीसी समाजाच्या आरक्षणावर गदा आणली आहे. तसेच या प्रकरणाच्या निषेधार्थ आणि दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई साठी ७ एप्रिल रोजी विट्याच्या तहसीलदार कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे.
दिघंची गटाचे जिल्हा परिषद पृथ्वीराज पाटील यांनी सादर केलेल्या कागदपत्रांत मोठी तफावत आहे. त्यांनी दिलेल्या पुराव्यानुसार, पाटील यांच्या पणजोबांचा मृत्यू १८७७ मध्ये झाला, तर आजोबांचा मृत्यू २००९ मध्ये दाखवला आहे. या हिशोबाने आजोबांचे वय १३४ वर्षे भरते, जे पूर्णपणे संशयास्पद आहे. तसेच वडिलांचा जन्म आजोबांच्या ९८ व्या वर्षी झाल्याचे सिद्ध होत असून, हा सर्व प्रकार प्रशासनाची दिशाभूल करणारा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
त्यामुळे खोटी कागदपत्रे असतानाही वैधता प्रमाणपत्र देणाऱ्या जात पडताळणी समितीच्या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल केले पाहिजेत, पृथ्वीराज पाटील यांच्यावर ४२० कलमांतर्गत गुन्हा नोंदवावा, शिवाय जिल्ह्यात अशा प्रकारे किती बोगस दाखले दिले गेले, याची सखोल चौकशी करावी.
संविधानाने दिलेल्या ओबीसी आरक्षणावर अशा फसव्या दाखल्यांमुळे अन्याय होत आहे. हे रोखण्यासाठी ७ एप्रिलच्या आंदोलनात भाजपचे सर्व पदाधिकारी आणि ओबीसी नेते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत, असेही संग्राम माने यांनी म्हंटले आहे.