येडेनिपाणी : येथे शनिवारी सकाळी पुन्हा एकदा बिबट्या दिसला. नारळाच्या झाडावरून बिबट्या खाली उतरताना काही ग्रामस्थांना आढळला. यामुळे परिसरात घबराट पसरली आहे. गेल्या महिनाभरात अनेक वेळा परिसरात बिबट्याचा वावर दिसून आला आहे.
शनिवारी सकाळी जोतिबा खिंड परिसरात उत्तम पाटील यांच्या शेतात नारळाच्या झाडावरून बिबट्या खाली उतरताना काही लोकांना दिसला. तेथे उपस्थित असणार्या काहींनी त्याचे मोबाईलद्वारे चित्रिकरणही केले. या परिसरात डोंगर व गर्द झाडी असल्याने तसेच ऊसशेती असल्याने बिबट्याचा वावर आहे. तसेच काही दिवसांपूर्वी याच परिसरात रात्रीच्या वेळी काही शेतकर्यांना तरसही दिसून आले होते. त्यामुळे रात्रीच्या वेळी शेतात जाण्यास शेतकरी घाबरू लागले आहेत. येडेनिपाणी परिसरात बिबट्या व त्याच्या पिलांचे सातत्याने दर्शन होत आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वन विभागाने बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी होत आहे.