आटपाडी : घाणंद ता. आटपाडी येथील ओढ्यात वाहून गेलेल्या आठ वर्षीय अजय विकास माने या चिमुकल्याचा मृतदेह अखेर मंगळवारी शोध पथकाला आढळून आला. सलग दोन दिवस सुरू असलेल्या जीवघेण्या शोधमोहीमेनंतर अजयचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण घाणंद गाव शोकमग्न झाले असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
अजय हा मतिमंद मुलगा असून तो पलूस येथील मूकबधिर शाळेत शिक्षण घेत होता. शाळेला सुट्टी लागल्याने तो काही दिवसांसाठी गावी आला होता. येत्या १ जून रोजी तो पुन्हा शाळेत जाणार होता. मात्र नियतीने त्याच्या आयुष्याला क्रूर वळण दिले. रविवारी दुपारी चारच्या सुमारास अजय गावाजवळील ओढ्याकाठी गेला असताना टेंभू योजनेचे पाणी सोडल्यामुळे ओढ्याला मोठा पूर आला होता. पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने तो अचानक पाण्यात वाहून गेला.
घटना समजताच ग्रामस्थांनी तातडीने शोध सुरू केला.टेंभू योजनेचे पाणी बंद करण्यात आले.मात्र वेगवान प्रवाह, चिखल, झुडपे आणि खोल पाणी यामुळे शोधकार्यात मोठ्या अडचणी निर्माण होत होत्या. सामाजिक कार्यकर्ते दत्ता झंजे यांनी त्वरित आयुष हेल्पलाईन टीम, हेल्पलाईन इमर्जन्सी रेस्क्यू फोर्स तसेच भारती विद्यापीठ रेस्क्यू टीमशी संपर्क साधत मदतीचे आवाहन केले. त्यानंतर तिन्ही पथकांनी घटनास्थळी धाव घेत सलग दोन दिवस ओढ्याच्या परिसरात शोधमोहीम राबवली.
अखेर मंगळवारी अजयचा मृतदेह शोधण्यात यश आले.जिथे हा मुलगा बुडाला त्या ठिकाणापासून एक किलोमीटर अंतरावर सापडलेल्या या मृतदेहाची अवस्था अत्यंत विदारक असल्याने घटनास्थळी उपस्थित ग्रामस्थांचे डोळे पाणावले. पंचनामा करून पुढील प्रक्रिया सुरू करण्यात आली.
या शोधमोहीमेत आयुष हेल्पलाईन टीमचे अविनाश पवार, ओंकार घुटूकडे, योगेश मदने, हेल्पलाईन इमर्जन्सी रेस्क्यू फोर्सचे महेश कुमारमठ, यशवंत गडदे, निलेश शिंदे, विष्णू व्होनमाने तसेच भारती विद्यापीठ रेस्क्यू टीमचे गजानन नरळे यांनी मोलाचे योगदान दिले. दत्तात्रय झंजे यांनीही प्रत्यक्ष ओढ्यात उतरून मदत केली. अजयच्या अकाली मृत्यूने घाणंद गाव सुन्न झाले असून “१ जूनला शाळेत जाणारा अजय आता कायमचाच निघून गेला” या भावनेने गावकऱ्यांचे मन हेलावून गेले आहे.