सांगली : महापालिकेच्या निवडणुकीसाठी मंगळवार, दि. 23 रोजी सहा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांमधून उमेदवारी अर्ज विक्रीस सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी तब्बल 574 उमेदवारी अर्जांची विक्री झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांमध्ये इच्छुकांची मोठी गर्दी झाली होती. उमेदवारी अर्जांची विक्रमी संख्येने विक्री होणार आणि अर्जही विक्रमी संख्येने दाखल होणार, असे चित्र दिसू लागले आहे.
महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज विक्रीचा कालावधी दि. 23 डिसेंबर ते 29 डिसेंबर सकाळी 11 ते दुपारी 3 व दि. 30 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 पर्यंत आहे. मंगळवारी उमेदवारी अर्ज विक्रीचा पहिला दिवस होता. या पहिल्या दिवशी सहा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांमधून एकूण 574 उमेदवारी अर्जांची विक्री झाली. मंगळवारी केवळ उमेदवारी अर्जांची विक्री करण्यात आली असून, पहिल्या दिवशी कोणत्याही उमेदवाराकडून उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा कालावधी दि. 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत आहे. उमेदवारी अर्ज ऑफलाईन भरायचे आहेत.सहा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांमधून उमेदवारी अर्ज विक्री सुरू आहे. उमेदवारी अर्ज विक्रीच्या पहिल्या दिवशी तब्बल 574 अर्जांची विक्री झाली.
यामध्ये सर्वाधिक 142 उमेदवारी अर्जांची विक्री निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक 6 यांच्या कार्यालयामधून झाली. प्रभाग क्रमांक 9, 10 व 11 च्या निवडणूक प्रक्रियेसाठी हे कार्यालय आहे. प्रभाग क्रमांक 1, 2 व 8 साठी 111, प्रभाग क्रमांक 3, 4 व 6 साठी 63, प्रभाग क्रमांक 5, 7 व 20 साठी 65, प्रभाग क्रमांक 15, 17, 18 व 19 साठी 99, प्रभाग क्रमांक 12, 13, 14 व 16 साठी 94, तर प्रभाग क्रमांक 9, 10 व 11 साठी 142 अर्जांची विक्री झाली आहे. उमेदवारी अर्ज मोठ्या संख्येने दाखल होणार व निवडणूक चुरशीने होणार, याची प्रचिती उमेदवारी अर्जाच्या पहिल्याच दिवशी आली आहे.
सर्व निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांमध्ये उमेदवारांसाठी स्वतंत्र अर्ज विक्री कक्ष, माहिती मार्गदर्शन व्यवस्था व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, सुलभ व नियमबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी महानगरपालिका प्रशासन पूर्णतः सज्ज आहे. इच्छुक उमेदवारांनी अधिकृत निवडणूक वेळापत्रकानुसार उमेदवारी अर्ज दाखल करावेत, असे आवाहन करण्यात येत आहे. उमेदवारी अर्जांची छाननी दि. 31 डिसेंबररोजी सकाळी 11 वाजल्यापासून होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत दिनांक 2 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत आहे. मतदान दि. 15 जानेवारी रोजी, तर मतमोजणी 16 जानेवारी रोजी आहे.