Accused murdered in Sangli
सांगली : चार वर्षापूर्वी भाजी विक्रेत्याच्या खूनातील संशयितांचा कोयत्याने सपासप वार करून निर्घुण खून करण्यात आला. ही घटना शंभरफुटी रस्त्यावरील एका दुचाकी शोरुमजवळ सकाळी सहाच्या सुमारास घडली. महेश प्रकाश कांबळे (वय ३८, रा. आंबा चौक, यशवंतनगर, सांगली) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी दोन तरुणांची नावे निष्पन्न झाली असून मृत कांबळे याने खून केलेल्या फिरोज उर्फ बडेशेर अली शेख याचा मुलगा मुजाहिद शेख व मित्राने हत्येचा बदला घेण्यासाठी हा खून केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला.
भरवस्तीत खूनाची घटना घडल्याने खळबळ उडाली होती. संशयितांची नावे निष्पन्न होताच स्थानिक गुन्हे अन्वेषण व सांगली शहर पोलिसांची दोन पथके संशयितांच्या शोधासाठी रवाना झाली आहे. याबाबत मयताचा नातलग विजय गणपती कांबळे यांनी शहर पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी मुजाहिद शेखसह अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, मृत महेश कांबळे याचा कोथिंबीराचा होलसेल व्यापार असून तो कुटुंबासह आंबा चौकात राहत होता. चार वर्षापूर्वी ३० नोव्हेंबर २०२१ रोजी भाजविक्रेता फिरोज शेख (रा. संजयनगर) याचा भाजीविक्री व्यवसायातील देण्याघेण्यावरून खून केला होता. या खूनात कांबळे याला अटक झाली होती. तो २०२३ मध्ये जामिनावर बाहेर आला होता. त्यानंतर त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती.
जामिनावर आल्यानंतर कांबळे याने पुन्हा भाजीविक्रीचा व्यवसाय सुरू केला. पण बापाच्या हत्येचा राग शेख याच्या मुलगा मुजाहिदच्या मनात साचून होता. त्याने बदला घेण्यासाठी कांबळेच्या खूनाचा कट रचला. गुरुवारी सकाळी सहाच्या सुमारास शंभरफुटी रस्त्यावरील होलसेल बाजारात कांबळे आला होता. भाजीबाजारापासून थोड्या अंतरावर दुचाकी शोरूमच्या कंपाऊड भिंतीलगत तो लघुशंकेसाठी थांबला. याचवेळी दोन्ही संशयितांनी डाव साधला. त्यांनी क्षणार्धात कांबळे याच्यावर कोयत्याने हल्ला केला. त्याच्या डोके, कपाळ, पोटावर सपासप अठरा वार केले. कांबळे रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर संशयितांनी पलायन केले.
नागरिकांनी कांबळे याला शासकीय रुग्णालयात नेले. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. खुनाच्या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपाधीक्षक प्रनील गिल्डा, शहरचे निरीक्षक संजय मोरे, एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून संशयितांच्या शोधासाठी पथके रवाना केली. दरम्यान वडिलांच्या खूनाचा बदला घेण्यासाठीच हा खून झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले.
मृत महेश कांबळे याचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. त्याचाही रागही संशयितांच्या मनात होता. शिवाय वडीलांच्या खूनाचा बदलाही त्यांना घ्यायचा होता. दोन वर्षापूर्वी कांबळे जामिनावर बाहेर आल्यापासून संशयितांच्या मनात राग होता. चार वर्ष डोक्यात खुन्नस होती. त्याला एकट्याला गाठण्याचा संशयितांनी प्रयत्न केला असावा. आज सकाळी तो भाजी बाजाराच्या ठिकाणी लघुशंकेसाठी थांबला असता संशयितांनी डाव साधल्याचे पोलिसांनी सांगितले.
महेश कांबळे याच्या खूनप्रकरणी मुजाहिद शेख व अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. संशयितांची नावे निष्पन्न होताच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व शहर पोलिसांची दोन पथके शोधासाठी रवाना करण्यात आली. संशयित दोघेही म्हैसाळ परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी म्हैसाळ परिसरात शोध घेतला, पण संशयित मिळून आले नाही. त्यांनी कर्नाटकात पलायन केले असावे, असा पोलिसांचा अंदाज आहे.