सांगली : महापालिका निवडणुकीसाठी प्रशासनाने राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार गुरुवारी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली. महापालिकेच्या 20 प्रभागांमध्ये एकूण 4 लाख 54 हजार 428 मतदार आहेत. मागील 2018 च्या निवडणुकीच्या तुलनेत आता आगामी निवडणुकीसाठी 30 हजार 249 मतदार वाढले आहेत. प्रारूप मतदार यादीत तब्बल 25 हजार 119 मतदारांची नावे दुबार आहेत.
महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे. यापूर्वी दोनवेळा प्रारूप मतदार यादी प्रसिध्दी लांबणीवर पडली होती. अखेर गुरुवार, दि. 20 रोजी महापालिका मुख्यालय, प्रभाग समित्यांची चार कार्यालये, तसेच महापालिकेच्या संकेतस्थळावर ही प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. प्रारूप यादीत महापालिका क्षेत्रातील 20 प्रभागात 4 लाख 54 हजार 428 मतदारांचा समावेश आहे. महापालिकेच्या 2018 च्या निवडणुकीत 4 लाख 24 हजार 179 मतदार होते. मागील निवडणुकीच्या तुलनेत आगामी निवडणुकीसाठी तब्बल 30 हजार 249 मतदार वाढले आहेत. या प्रारूप मतदार यादीत 25 हजार 119 संभाव्य दुबार मतदार आहेत.
महापालिका प्रशासनाने जाहीर केलेल्या प्रारूप मतदार यादीनुसार सांगलीतील प्रभाग समिती क्रमांक 1 मध्ये 6 हजार 694 व प्रभाग समिती 2 मध्ये 6 हजार 701, कुपवाडमधील प्रभाग समिती 3 मध्ये 5 हजार 524, तर मिरजेतील प्रभाग समिती 4 मध्ये 6 हजार 200 मतदारांची नावे दुबार आहेत. यात सर्वाधिक 6 हजार 701 दुबार नावे सांगलीतील प्रभाग समिती 2 मध्ये, तर सर्वात कमी 5 हजार 524 दुबार नावे कुपवाडच्या प्रभाग समिती 3 मध्ये आहेत.
महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रारुप मतदार यादीनुसार सर्वाधिक 27 हजार 358 मतदार सांगलीतील प्रभाग 14 मध्ये आहेत. हा प्रभाग प्रामुख्याने सरकारी तालिम, गावभाग ते जोतिरामदादा कुस्ती आखाडा या भागातील आहे. सर्वात कमी 15 हजार 512 मतदार सांगलीवाडी येथील प्रभाग 13 मध्ये आहेत.
महापालिका निवडणुकीसाठी गुरुवार, दि. 20 रोजी प्रारूप मतदार यादी जाहीर झाली. या यादीवर हरकती व सूचना दाखल करण्यासाठी दि. 27 नोव्हेंबरपर्यंत मुदत आहे. हरकती व सूचनांवर निर्णय घेऊन प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी 5 डिसेंबररोजी प्रसिद्ध होणार आहे. यानंतर दि. 8 डिसेंबररोजी मतदार केंद्रे व दि. 12 डिसेंबररोजी मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे.