सांगली : डॉग शेल्टर, ॲनिमल बर्थ कंट्रोल याबाबत शासनाच्या नगरविकास विभागाला चुकीची, अपूर्ण व विलंबाने माहिती सादर केल्याप्रकरणी महापालिकेचे कार्यालय प्रमुख तथा स्वच्छता अधिकारी अतुल आठवले यांना निलंबित करण्यात आले. दरम्यान, महापालिकेच्या वाहनांना लावलेली जीपीएस प्रणाली परस्पर काढल्याप्रकरणी रिक्षा घंटागाडीचे चालक आशिषकुमार नरगुंदे, ट्रॅक्टर चालक नीलेश पाटील व प्रवीण शिष्टे या मानधन तत्त्वावरील कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले. आयुक्त सत्यम गांधी यांनी ही कारवाई केली.
महानगरपालिकेच्या ताफ्यातील सर्व 275 वाहनांना अत्याधुनिक जीपीएस प्रणाली लावली आहे. घंटागाडी, जेसीबी, पाणी टँकर्स, अग्निशमन वाहने तसेच अधिकाऱ्यांच्या वाहनांचा समावेश आहे. जीपीएस प्रणालीमुळे वाहन कधी, कुठे फिरले, किती फिरले, किती अंतर चालले, कुठे थांबले ही सर्व माहिती मोबाईल ॲपवर नागरिक व प्रशासनाला दिसत आहे. या उपक्रमामुळे महापालिकेच्या सेवा जास्त जबाबदार, अधिक विश्वसनीय आणि पारदर्शक बनत आहेत. याचा थेट लाभ शहरातील नागरिकांना मिळत आहे. दरम्यान, तीन वाहनांना जीपीएस प्रणाली नसल्याचे आढळून आले. कोणतीही परवानगी न घेता जीपीएस प्रणाली काढणे, ही बाब अतिशय गंभीर आहे. त्यामुळे रिक्षा घंटागाडी तसेच दोन ट्रॅक्टरच्या चालकांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे.
वारंवार माहिती मागवूनही दुर्लक्ष
पशुवैद्यकीय विभागांतर्गत ॲनिमल बर्थ कंट्रोल व डॉग शेल्टरसंदर्भातील अत्यंत महत्त्वाची माहिती वारंवार मागवूनही ती चुकीची, अपूर्ण व अत्यंत विलंबाने शासनाच्या नगरविकास विभागाला सादर केल्याप्रकरणी, तसेच वरिष्ठांच्या स्पष्ट सूचनांकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केल्याबद्दल कार्यालयप्रमुख तथा स्वच्छता अधिकारी अतुल आठवले यांना सेवेतून तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. कार्यालय प्रमुख या नात्याने अपेक्षित असलेली दक्षता न पाळणे, शासन निर्देशांची वेळेत अंमलबजावणी न करणे व प्रशासकीय कामकाजात अडथळा निर्माण करणे, ही बाब अत्यंत गंभीर शिस्तभंगाची असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.