मृत मनिषा केसरेकर, जखमी मोहन केसरेकर व संशयित फरीद शेख  
सांगली

Sangli Murder | कचरा टाकल्याच्या कारणावरून महिलेचा खून, पती गंभीर : स्वातंत्र्यदिनी कुपवाड येथे घटना!

संशयित काही तासांतच जेरबंद

पुढारी वृत्तसेवा

कुपवाड : 'कचरा टाकल्याच्या कारणावरून'शेजाऱ्याने महिलेच्या डोके, पोटात धारदार चाकूने सपासप वर्मी वार करून खून केल्याची घटना कुपवाड येथे शनिवार १५ ऑगस्ट रोजी घडली. तर पत्‍नीला सोडवण्यास गेलेल्या पतीच्याही डोक्यात आरोपीने हातोडा घालून गंभीर जखमी केले. मनिषा मोहन केसरेकर (वय ३५)असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर मोहन नागाप्पा केसरेकर (वय ४५, दोघेही सध्या रा.विघ्नहर्ता शांती काॅलनी,चाणक्य चौकाजवळ, कुपवाड.मूळ गाव हेब्बाळ जि.बेळगाव,कर्नाटक.)असे गंभीर जखमीचे नाव आहे.

जखमीवर मिरजेतील शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर संशयित सायकलवरून पसार झाला. या घटनेची माहिती मिळताच सांगलीतील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने दोन तासांच्या आत संशयितास जेरबंद केले. फरीद अब्दुल शेख (वय ५२,सध्या रा.विघ्नहर्ता शांती काॅलनी, चाणक्य चौकाजवळ, कुपवाड.मूळ रा.रेणुका मंदिरासमोर, धनगर गल्ली,वाॅन्लेसवाडी,सांगली ) असे संशयिताचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी : मनिषा केसरेकर ही महिला शनिवार दि.१५ रोजी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घराबाहेर गरम पाणी करण्यासाठी चुल पेटवित असताना शेजारी राहणारा संशयित फरीद शेख याने घराचे मागे रस्त्यावर कचरा टाकला. त्याचा जाब मनिषा केसरेकर यांनी संशयित शेख याला विचारला असता दोघांत भांडण सुरू झाले. यावेळी मोहन केसरेकर यांनी शेखला समजावून सांगत असताना शेख याने मोहन यांच्या कानाखाली मारली. माझ्या नवऱ्याला का मारले असा जाब मनिषा हिने शेखला विचारला असता शेख याने रागाने घरात जाऊन घरातील हातोडा व चाकू आणला.

संशयित फरीद शेख याने 'तुला जीवंत ठेवत नाही' असे म्हणून मोहन केसरेकर याच्या डोक्यात हातोडा मारून गंभीर जखमी करून त्यांचा खून करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर संशयित शेख याने मनिषाच्या डोक्यात, पोटात चाकूने चाकूने सपासप वर्मी वार करून तिचा खून केला. या घटनेनंतर संशयित शेख सायकलवरून पसार झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलिस अधीक्षक कल्पना बारवकर, सांगलीतील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक संजीव झाडे, कुपवाड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक आनंदराव घाडगे यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली.

सांगलीतील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने दोन तासांच्या आत गुन्ह्यातील संशयित फरीद शेख याला वाॅन्लेसवाडी येथे जेरबंद केले. संशयित शेख याने सदर गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली आहे. सांगलीतील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने संशयित शेख याला पुढील तपासासाठी कुपवाड पोलिसांच्या ताब्यात दिले.

दरम्यान, संशयित फरीद शेख हा फरशी मिस्त्री म्हणून काम करीत होता.तर मोहन केसरेकर हे गवंडी काम करतात. त्यांच्या पत्नी मनीषा घरकाम करतात. केसरेकर यांनी गेल्या नऊ ते दहा महिन्यांपूर्वी कुपवाड येथे नवीन घर बांधून राहत होते. तर संशयित शेख हा पुर्वीपासून एकटाच केसरेकरांच्या शेजारी राहत होता. मोहन व मनीषा केसरेकर यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलगी अकरावीमध्ये, तर मुलगा सातवीमध्ये शिक्षण घेत आहे.

फोटो ओळ : कुपवाड : १)मोहन केसरेकर व मनिषा केसरेकर यांच्यावर झालेल्या हल्ल्याची माहिती केसरेकर यांच्या मुलीकडून घेताना अप्पर पोलिस अधीक्षक कल्पना बारवकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक आनंदराव घाडगे व इतर.(२)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT