Wind Energy Companies Land Issue
विटा : खानापूर तालुक्यातील ज्या गावांत पवनऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी जमिनी घेतल्या होत्या. तिथे न उभारलेल्या किंवा वापर न केलेल्या सर्व जमिनी मूळ शेतकऱ्यांना परत दिल्या जाव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष ॲड. बाबासाहेब मुळीक यांनी शासनाकडे केली आहे.
याबाबत माहिती देताना ॲड. मुळीक म्हणाले, तालुक्यातील रेणावी, रेवणगाव, लेंगरे, भूड, वासंबे, कुर्ली, पारे, बलवडी (खा), जाधववाडी, मेंगाणवाडी, धोंडेवाडी, भडकेवाडी आदी गावांतील शेत जमिनी पवनचक्की कंपन्यांनी पवनऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी शेतकऱ्याकडून अत्यंत कमी किमतीत खरेदी केल्या आहेत. यापैकी काही ठिकाणी पवनचक्क्या उभारल्यात. परंतु अनेक ठिकाणी असे पवनऊर्जा प्रकल्पच उभा केलेले नाहीत, अशा जमिनी मूळ शेतकऱ्यांना परत मिळाल्या पाहिजेत.
परंतु सध्या पवनऊर्जा प्रकल्प न उभारलेल्या जमिनी संबंधित कंपन्यां च्या दलालांमार्फत मोठ्या किंमतीस विक्री करण्याची प्रक्रिया चालू केली आहे. यापैकी काही जमिनींची विक्रीही झाली आहे. वास्तविक पवनचक्की कंपन्या या शेतकरी नाहीत, त्यामुळे त्यांना अशा प्रकारे शेतजमिनींची विक्री करता येणार नाही. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील पवनचक्की प्रकल्प उभारून शिल्लक राहिलेल्या जमिनी मूळ शेतकऱ्यांनाच परत दिल्या जाव्यात. याशिवाय पवनऊर्जा प्रकल्पांसाठी कंपन्यांनी खरेदी केलेल्या जमिनींबाबत झालेले संशयास्पद व्यवहार तपासून फेरफार रद्द करावेत, असे निर्देश दिले आहेत.
तरीही जमिनीची विक्री सुरू आहे. परिणामी खानापूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे. लवकरच पवनऊर्जा प्रकल्पामुळे बाधित शेतकऱ्यांची बैठक घेऊन त्यांना आपल्या जमिनी परत मिळविण्यासाठी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया करण्याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून जमिनी मूळ शेतकऱ्यांना परत मिळण्यासाठी आपण सर्वतोपरी सहाय्य करणार आहे. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीत शेतकऱ्यांच्या परवानगीशिवाय विद्युत खांब उभारण्यात आलेल्या आहेत. त्या बाधित शेतकऱ्यांना त्याचा मोबदला मिळावा, यासाठी कायदेशीर लढा उभारणार असल्याने पवनऊर्जा प्रकल्प बाधित शेतकऱ्यांनी संपर्क करण्याचे आवाहन ॲड. मुळीक यांनी केले आहे.