सांगली

Sangli NCP : खानापूरमध्ये सदाशिवराव पाटील शरद पवारांसोबत; तर चिरंजीव अजित पवारांच्या स्वागताला

अविनाश सुतार


विटा: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पवार कुटुंबातील फुटीनंतर आता खानापूर मतदारसंघातील माजी आमदार सदाशिवराव पाटील कुटुंबातही राजकीय दुही माजणार का ? असा सवाल पाटील गटातील पदाधिकारी आणि कार्यकर्तेच एकमेकांना विचारू लागले आहेत. परिणामी खानापूर मतदारसंघातील पाटील गटात मोठा संभ्रम निर्माण झालेला आहे. (Sangli NCP)

खानापूर मतदारसंघामधील पाटील गटासाठी आजचा शनिवारचा दिवस जणू परीक्षेत चा दिवस ठरला आहे. आज दुपारीच आपण अजितदादांचे स्वागत करण्यासाठी केदारवाडी येथे जात असल्याची घोषणा माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी केली. त्यानुसार पाटील गटाचे कार्यकर्ते रिचार्ज होऊन कामाला लागले. उद्याच्या कोल्हापूरच्या सभेबरोबरच राष्ट्रवादीतील फुटीनंतर पहिल्यांदाच अजितदादा हे सांगली जिल्ह्यातून कोल्हापूरकडे जाणार आहेत. त्यासाठी कोल्हापूर बरोबरच सांगलीत ही शक्ती प्रदर्शन करणे अजित पवार यांना अपेक्षित आहे. सांगली जिल्ह्यातील अजित पवार गटाचे कार्यकर्तेही कामाला लागले आहेत. (Sangli NCP)

दरम्यान, वैभव पाटील यांनी वाळवा तालुक्यातील केदारवाडी येथे स्वागताची जय्यत तयारी सुरू केली आहे. साधारणपणे ४५० गाड्या भरून कार्यकर्ते आणण्याचे त्यांचे नियोजन आहे. त्या दृष्टीने निरोप आणि फोनाफोनी सुरू असतानाच माजी आमदार सदाशिवराव पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सांगलीतील बैठकीचा फोटो व्हायरल झाला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा संभ्रम पसरलेला आहे. मुळात विट्याचे पाटील घराणे हे पूर्वीपासून शरद पवार यांचे समर्थक राहिलेले आहे. मात्र, पवार घराण्यातच आता राजकीय फूट पडल्याने विट्याच्या पाटील घराण्यामध्येही फूट पडणार का ? अशी शंका व्यक्त होत आहेत.

दरम्यान, माजी आमदार सदाशिव पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, वैभव पाटील यांनी अजित पवार यांच्या स्वागतासाठी जाण्याचा निर्णय घेतला असेल, तर तो त्यांचा निर्णय आहे. मी मात्र जयंत पाटील यांच्या बैठकीला उपस्थित होतो. कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. आपली नेमकी भूमिका काय? यावर त्यांनी आताच गडबड नाही, योग्य वेळ आली की बोलेन, अशी संदिग्ध प्रतिक्रिया दिली. मात्र, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्येही मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT