Suvarna Bhosle Chairperson Pudhari
सांगली

Khanapur Panchayat Samiti | खानापूर पं. स. सभापतीपदी सुवर्णा भोसले, उपसभापतीपदी सुहास शिंदे बिनविरोध

Sangli News | पंचायत समितीच्या निवडणुकीत आठही जागांवर विजय मिळवत शिवसेनेने पंचायत समितीवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित

पुढारी वृत्तसेवा

Khanapur Panchayat Samiti Suvarna Bhosle Chairperson

विटा : खानापूर तालुका पंचायत समितीच्या सभापतीपदी घानवडच्या सुवर्णा प्रशांत भोसले यांची, तर उपसभापतीपदी बेणापूरचे सुहास मालोजीराव शिंदे यांची बिनविरोध निवड झाली. या निवड प्रक्रियेचे कामकाज प्रांताधिकारी विक्रमसिंह बांदल यांनी पिठासीन अधिकारी म्हणून पाहिले.

पंचायत समितीच्या निवडणुकीत आठही जागांवर विजय मिळवत शिवसेनेने पंचायत समितीवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. नूतन पदाधिकाऱ्यांचा जिल्हा बँकेचे संचालक, उपनगराध्यक्ष तसेच शिवसेना नेते अमोल बाबर यांनी सत्कार केला. निवडीनंतर समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला.

सभापती व उपसभापती पदाची निवड प्रक्रिया सकाळी अकरा वाजता सुरू झाली. सभापती पद नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिला गटासाठी राखीव होते. या पदासाठी नागेवाडी गणातून विजयी झालेल्या घानवडच्या माजी सरपंच सुवर्णा भोसले यांनी एकमेव उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या अर्जाला महेश घोरपडे यांनी अनुमोदन दिले.

उपसभापती पदासाठी बलवडी (खा.) गणातून विजयी झालेले माजी जिल्हा परिषद सदस्य सुहास शिंदे यांनी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या उमेदवारीला तेजश्री लोखंडे यांनी अनुमोदन दिले. निर्धारित वेळेत दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाल्याने सुवर्णा भोसले आणि सुहास शिंदे यांची बिनविरोध निवड झाल्याचे प्रांताधिकारी विक्रमसिंह बांदल यांनी जाहीर केले.

निवडीनंतर सभापती सुवर्णा भोसले भावूक होत म्हणाल्या, अनिलभाऊ आणि शोभाकाकी यांनी आम्हाला पुत्रवत प्रेम दिले. तसेच आमदार सुहास बाबर आणि उपनगराध्यक्ष अमोल बाबर यांनी आमच्यावर विश्वास ठेवत अपेक्षेपेक्षा मोठी संधी दिली. या विश्वासाचे सोने करून सामान्य माणसासाठी काम करू, असे त्यांनी सांगितले.

उपसभापती सुहास शिंदे म्हणाले, अनिलभाऊंनी ज्या ठिकाणी काम केले, त्याच ठिकाणी काम करण्याची संधी मिळणे ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. प्रशासन जिथे कमी पडेल तिथे लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही ठामपणे लोकहितासाठी उभे राहू. पंचायत समितीच्या सर्व योजना तालुक्याच्या तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करू, असे त्यांनी सांगितले.

यावेळी अमोल बाबर म्हणाले, खानापूर तालुक्याला सक्षम सभापती आणि उपसभापती मिळाले आहेत. दोघांनाही पंचायत राज व्यवस्थेचा अनुभव आहे. आमदार अनिलभाऊ तसेच ज्येष्ठ नेते माजी आमदार मोहनराव कदम यांसारख्या दिग्गजांनी या पंचायत समितीचे नेतृत्व केले आहे. नवीन पदाधिकारीही या परंपरेला साजेसे काम करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी गणपतराव भोसले, कृष्णात शिंदे, राजाभाऊ शिंदे, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष हेमंत बाबर, रोशन जाधव, प्रतिभा शेंडे, पायल कदम, पांडुरंग खोत, संजय मोहिते, गटविकास अधिकारी डॉ. संताजी पाटील, पांडुरंग डोंगरे, सदाशिव हसबे, दादासाहेब पाटील, पोपट माने, राजेश कदम, प्रकाश बागल, अभिजित कदम, प्रशांत भोसले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT