Mahavitaran officials privilege motion
विटा : महायुतीत पुन्हा एकदा मतभेदाची ठिणगी पडल्याचे दिसून येत आहे. प्रोटोकॉलचे उल्लंघन झाल्याचा आरोप करत शिंदे गटाच्या शिवसेनेचे खानापूर मतदारसंघाचे आमदार सुहास बाबर यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांविरोधात हक्कभंग प्रस्ताव दाखल केला आहे.
आटपाडी तालुक्यातील हिवतड, शेटफळे आणि दिघंची येथील तीन वीज उपकेंद्रांच्या उद्घाटन सोहळ्यासाठी स्थानिक आमदार असूनही आपल्याला निमंत्रण देण्यात आले नाही, असा बाबर यांचा आरोप आहे. उलट, दुसऱ्या मतदारसंघातील आमदारांना बोलावून त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. शासनाच्या नियमांनुसार अशा कार्यक्रमांबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींशी सल्लामसलत करणे अपेक्षित असताना तसे झाले नाही, असे त्यांनी नमूद केले.
या प्रकरणी बाबर यांनी विधानसभा नियम २७३ अंतर्गत महावितरणच्या संचालिका नीता केळकर यांच्यासह चार वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात विशेषाधिकार भंगाचा प्रस्ताव सादर केला आहे. संबंधित प्रकल्पांसाठी आपण स्वतः पाठपुरावा करून अडचणी दूर केल्या होत्या, तरीही जाणीवपूर्वक कार्यक्रमापासून दूर ठेवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यात अशा प्रकारची पद्धत रूढ होणे धोकादायक ठरेल, अशीही त्यांनी चिंता व्यक्त केली.
दरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या प्रकरणाची दखल घेतली असून लोकप्रतिनिधींच्या प्रोटोकॉलचे उल्लंघन झाल्यास ती गंभीर बाब असल्याचे म्हटले आहे. या घटनेची तातडीने माहिती घेऊन योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.