Kavathe Mahankal Kongnoli youth attack
कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ शहरातील उपकोषागार कार्यालयासमोर झालेल्या मारहाणीच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. फिर्यादी मोहसीन दस्तगीर जमादार (वय ३७, रा. कोंगनोळी, ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आठ जणांविरोधात कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, दि. ११ नोव्हेंबर रोजी रात्री सुमारास आठ वाजता फिर्यादीचा भाऊ मन्सूर, त्याची पत्नी साईशा, फिर्यादीची पत्नी करिष्मा, तसेच राहुल कांबळे व त्याची पत्नी अनिशा यांनी सलगरे येथे फिर्यादीच्या भावास केलेल्या मारहाणीची तक्रार पोलीस ठाण्यात दिली.
यावेळी फिर्यादीच्या ओळखीचा अतुल जगन्नाथ कांबळे (रा. कोंगनोळी) याच्या सांगण्यावरून संशयित आरोपी रवी खत्री, प्रदीप मोरे, लोकेश नाईक, महादेव भंडारी, सोमनाथ डवरी, साहिल डफेदार, सत्तार महात यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादीच्या भावास अतुल कांबळे यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यास तक्रार करण्यास सांगितल्याचे कारणावरून रवी खत्री व त्याच्या सोबत असलेल्या व साथीदारांनी फिर्यादीस हाताने व लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. रवी खत्री व प्रदीप मोरे यांनी त्यांच्या कमरेस असलेला चाकू बाहेर काढून आता याला जिवंत ठेवायचे नाही, असे म्हणून रवी खत्री याने फिर्यादी भावाच्या पोटात व प्रदीप मोरे यांनी डावी बाजूस काखेजवळ बरगडीत चाकूने भोकसून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात फिर्यादी गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेची नोंद कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर करीत आहेत.