

सांगली : सांगली, मिरज तसेच कुपवाड ड्रेनेज योजनांच्या कामांना गती द्या, कामांचा दर्जा राखण्याबरोबरच वेळेत काम पूर्ण झाले पाहिजे, अशा सक्त सूचना आयुक्त सत्यम गांधी यांनी अधिकारी व ठेकेदार कंपनी प्रतिनिधींना दिल्या. सांगली व मिरज ड्रेनेज योजनेचे काम गतीने पूर्ण करण्याबरोबरच कुपवाड ड्रेनेज योजनेचे काम दि. 31 मार्च 2026 पूर्वी पूर्ण करण्याचे आदेश दिले.
आयुक्त सत्यम गांधी यांनी सोमवारी सांगली, मिरज तसेच कुपवाड ड्रेनेज योजनेच्या कामांना भेट दिली. महापालिकेच्या जलनि:सारण विभागाचे कार्यकारी अभियंता चिदानंद कुरणे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उपअभियंता ए. डी. चौगुले तसेच अभियंते व कंत्राटदार कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.
स्वामी समर्थ हॉस्पिटल ते भारती हॉस्पिटल परिसर येथील कामांची आयुक्त गांधी यांनी पाहणी केली. कुपवाड ड्रेनेज योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांची गती वाढवा आणि दि. 31 मार्चपूर्वी सर्व जोडणी पूर्ण करा, अशी सूचना आयुक्त गांधी यांनी दिली. जयहिंद कॉलनी ते आनंदनगर नाला परिसरात नाल्याजवळील बफर झोनमधून जात असलेल्या ड्रेनेज लाईनचे काम तपासले. पर्यावरणाचे निकष पाळून, काम सुरक्षितपणे पूर्ण करण्याचे आदेश दिले. उपाध्ये स्कूल परिसरात शाळेच्या ड्रेनेज लाईनला अडथळा निर्माण करणाऱ्या कंपाऊंडविषयी पाहणी केली. या अडथळ्यावर तातडीने तोडगा काढून काम सुरू करण्याचे निर्देश दिले.
ढवळेश्वर प्लॉट व उल्हासनगर येथे सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. कामातील सर्व अडथळे त्वरित दूर करण्याच्या सूचना दिल्या. आर. पी. पाटील हायस्कूल परिसरात शाळेजवळील ड्रेनेज लाईनचे निरीक्षण करून, भविष्यात समस्या उद्भवू नयेत यासाठी दीर्घकालीन उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. उत्कर्ष नगरमध्ये नवीन ड्रेनेज लाईन टाकण्याबाबत प्रस्ताव तयार करण्याचे व काम तातडीने हाती घेण्याचे आदेश संबंधित विभागांना दिले.
नागरिकांना जलनिःसारणशी संबंधित कोणतीही अडचण येऊ नये, हे प्रशासनाचे प्राधान्य आहे. सर्व कामे वेळेत, दर्जेदार आणि शास्त्रीय पद्धतीने पूर्ण व्हावीत यासाठी प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली जात आहे. कंत्राटदारांनी कामाच्या गुणवत्तेकडे विशेष लक्ष द्यावे, असे निर्देशही आयुक्त गांधी यांनी दिले.