सांगली : कवलापूर (ता. मिरज) येथील विमानतळाच्या कामासह हेलिपॅड आणि कृषी पर्यटनाच्या उभारणीस नववर्षात चालना देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिली.
काकडे म्हणाले, दिल्ली येथील एअरपोर्ट ॲथॉरिटी ऑफ इंडियाचे पथक कवलापूर येथील विमानतळाच्या प्रस्तावित जागेची पाहणी करण्यासाठी येत आहे. यासंदर्भात त्यांच्याशी चर्चाही झाली आहे. येत्या पंधरवड्यात हे पथक कवलापूर येथे भेट देण्याची शक्यता आहे. यामुळे विमानतळाच्या मंजुरीसाठी चालना मिळणार आहे. यामुळे जिल्ह्यातून कृषी मालाच्या निर्यातीलाही प्रोत्साहन मिळणार आहे. याशिवाय जिल्ह्यामध्ये कायमस्वरूपी हेलिपॅडच्या उभारणीसही प्रारंभ करण्यात येणार आहे. यासाठी शहरातील मध्यवर्ती ठिकाण निश्चित करण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी राबवण्यात आलेल्या ‘बायर्स-सेलर्स मीट’ या सांगली पॅटर्नची राज्य शासनाने दखल घेतली असून, हा उपक्रम आता राज्यभर चालवण्यात येणार आहे.
नववर्षात जिल्ह्यात कृषी पर्यटन केंद्राच्या उभारणीस प्राथमिकता देण्यात येणार आहे. या केंद्रात शेतीशी निगडित अनुभव पर्यटकांना देणारे ठिकाण, जिथे त्यांना जेवण, शेतात फिरणे, लोककलांचा आस्वाद आणि ग्रामीण संस्कृतीचा अनुभव मिळणार आहे. यामुळे शहरी भागातील लोकांना ग्रामीण जीवनशैलीचा अनुभव घेता येईल, शेतीची प्रत्यक्ष माहिती उपलब्ध होईल, तसेच शेतकऱ्यांना अशा पर्यटन संधींमुळे अतिरिक्त उत्पन्न मिळण्यास मदत होणार आहे. शेतकऱ्यांसाठी ही मोठी पर्वणी मानण्यात येते.