आटपाडी ः माणगंगा सहकारी साखर कारखाना, सोनारसिद्धनगर (ता. आटपाडी) येथे 27 डिसेंबर रोजी रात्री 1.30 वाजता चोरीचा प्रयत्न झाला. सुरक्षा रक्षकावर हल्ला करत चोरट्यांनी सुमारे 12 लाखांच्या इलेक्ट्रिक मोटारी चोरण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. आटपाडी पोलिसांनी तातडीने कारवाई करत एका चोरट्यास घटनास्थळीच ताब्यात घेतले. यानंतर उर्वरित तिघांना शोधमोहीम राबवून 29 डिसेंबर रोजी दुपारी अटक करण्यात आली.
याप्रकरणी दत्तात्रय शिवाजी गोडसे (वय 24, रा. नरळेवाडी, ता. सांगोला, जि. सोलापूर), करण रघुनाथ ढेंबरे (18, रा. नरळेवाडी, ता. सांगोला, जि. सोलापूर), सचिन सहजीवन चव्हाण (21), कमरान इस्माईल ठाकूर (19, रा. अजगणी, ता. खेड, जि. रत्नागिरी) या संशयितांना अटक करण्यात आली आहे.
फिर्यादी अण्णासाहेब महादेव जाधव (53) हे कारखान्यात सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आटपाडी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांनी कारखान्यातील वेगवेगळ्या विभागांतील विद्युत मोटारी उखडून एका ठिकाणी एकत्रित केल्या. त्या दोन वाहनांमध्ये भरून चोरीसाठी नेण्यात येत होत्या. हा प्रकार लक्षात येताच सुरक्षा रक्षकाने चोरट्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी चोरट्यांनी त्याच्यावर हल्ला केला. घटनेची माहिती मिळताच आटपाडी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत कारवाई केली.