सांगली

सांगली : सुहास शिंदेंना राजकीय ताकद देण्याची जबाबदारी आमची : आमदार अनिल बाबर

मोहन कारंडे

विटा; पुढारी वृत्तसेवा : खानापूर घाटमाथ्याचे काँग्रेसचे नेते व माजी जि. प. सदस्य सुहास शिंदे यांना राजकीय ताकद देण्याची जबाबदारी आमची आहे, असे आमदार अनिल बाबर यांनी म्हटले आहे. सुहास शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी भाजपचे खासदार संजय पाटील व आमदार बाबर यांनी भगवी शाल देऊन शिंदे यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी बोलताना खासदार संजय पाटील म्हणाले की, सुहास हे जरी काँग्रेसचे असले तरी सर्वपक्षीय नेत्यांकडे समतोल राखण्याचे कसब त्यांच्याकडे आहे. सुहास यांना घातलेली शाल भगवी आहे. हे मला आमदारांनी लक्षात आणून दिले. गतवेळच्या निवडणुकीवेळी नातीगोती आड आल्याने सुहास यांना बाबर यांच्या बरोबर सोडले. भविष्याचा वेध राजकारणातले सगळेच लोक घेत असतात. त्यामुळे सुहास यांचे जे राजकीय इप्सित आहे, ते सर्वजण मिळून पूर्ण करू असे आवाहन त्यांनी केले. तोच धागा पकडून आमदार बाबर म्हणाले की, सुहास यांना दिलेली शाल भगवी आहे, पण ती मी आणली नाही. त्यांच्या कार्यकर्त्यांनी आणली आहे. ते पण मोठे हुशार आहेत. उद्या कोणी विचारलं तर भगवा रंग फक्त पक्षाचाच नव्हे तर अध्यात्माचा सुद्धा आहे. पण रंगाचा विषय सोडला तर मी आणि खासदारांनी शाल घातल्यामुळे त्यांच्यामागे राजकीय ताकद उभा करायची जबाबदारी आमची आहे, असे ते म्हणाले.

त्याला उत्तर देताना सुहास शिंदे म्हणाले, अनेक संघर्ष करून २०१२ साली मी जिल्हा परिषद सदस्य झालो. तेव्हा बाबर यांच्या विरोधात होतो. खानापूर घाटमाथ्याला जो पाणी देईल त्यांचे आम्ही काम करणार, असे जाहीर केले होते. आमदार बाबर आणि खासदार पाटील यांच्या माध्यमातून या भागात पाणी मिळाले. आपल्या दोघांचे प्रेम आमच्या मागे कायम असावे, असे सुहास शिंदे यांनी म्हटले. यावेळी काँग्रेसचे अशोक गायकवाड, रवीअण्णा देशमुख, सुरेश पाटील, जयदीप भोसले आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT