बीड : माजलगाव धरणात बुडालेल्‍या डॉक्‍टरांना शोधताना कोल्‍हापूरच्या जवानाचा बुडून मृत्यू | पुढारी

बीड : माजलगाव धरणात बुडालेल्‍या डॉक्‍टरांना शोधताना कोल्‍हापूरच्या जवानाचा बुडून मृत्यू

माजलगाव (जि. बीड) ; पुढारी वृत्‍तसेवा : येथील डॉ. दत्ता फपाळ रविवारी (दि. १८) सकाळी माजलगाव धरणात पोहण्यासाठी गेले असता, धरणाच्या पाण्यात बुडून ते बेपत्ता झाले होते. रविवारी दिवसभर त्यांचा विविध पथकांनी शोध घेतला. मात्र बारा तास त्यांचा शोध घेऊनही त्‍यांचा तपास न लागल्याने आज सकाळी कोल्हापूर येथून जिल्हा आप्पती व्यवस्थापन पथकाला पाचारण करण्यात आले. हे पथक सकाळी १० वाजण्याच्या सुमारास डॉ फपाळ यांचा शोध घेण्यासाठी  पाण्यात उतरले. यावेळी या पथकातील राज मोरे (वय २८)  या जवानाचा देखील याच धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडल्याने खळबळ उडाली. या घटनेनंतर जिल्हाधिकारी शर्मा हे देखील माजलगाव धरणावर दाखल झाले आहेत.

माजलगाव धरणात पोहण्यासाठी गेलेल्या डॉ. दत्ता फपाळ हे काल (रविवारी) सकाळी ७ वाजता पाण्यात बुडून बेपत्ता झाले होते. डॉ. फपाळ यांचे वैद्यकीय क्षेत्रात असलेले योगदान पाहता शासनाची संपूर्ण यंत्रणा विविध पथकांमार्फत दिवसभर शोधकार्य करत होती. यावेळी सायंकाळपर्यंत त्‍यांचा शोध लागला नसल्याने लातूर येथील केडीआर पथकाला पाचारण करण्यात आले. मात्र, आहमपूर येथे याच कामी हे पथक कार्यरत असल्याने प्रशासनाने तत्काळ कोल्हापूर येथील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन या पथकास रातोरात पाचारण केले. या पथकातील जवान माजलगाव धरणात शोध घेण्यासाठी पाण्यात उतरले. यातील दोन जवान ऑक्सिजनसह पाण्यात उतरले. बराच वेळ शोध घेतला असता, त्यांना डॉ. फपाळ यांच्या शोध लागला नाही. काही वेळात एक जवान बाहेर आला. मात्र, शोध पथकातील राज मोरे हा जवान बाहेर न येता त्याचे ऑक्सिजन सिलिंडर बाहेर आले. तो जवान पाण्यातून बाहेर न आल्याने प्रशासकीय यंत्रणा हादरुन गेली होती. दरम्यान या जवानाचा मृतदेह आढळून आला.

माजलगाव धरणात मासेमारी करणाऱ्यांनी टाकलेल्या जाळ्यात अडकल्याने या जवानास पाण्यातून वर येता आले नाही. यामुळे हा अपघात घडला. या प्रकारामुळे माजलगाव धरणावर लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. यामुळे मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त पाचारण करण्यात आला.

हेही वाचा :  

Back to top button