Sadabhau Khot on Jayant Patil
ईश्वरपूर : शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील एनडीएसोबत आले, तर त्यांचे आम्ही स्वागतच करू. त्यांच्या सरकारमधील प्रवेशाचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल. या निर्णयाशी आम्हाला काही देणे घेणे नाही. मात्र, असे झाले तर हा त्यांचा नैतिक पराभव असेल. व आमचा तो विजय असेल, असे प्रतिपादन आ. सदाभाऊ खोत यांनी येथे पत्रकारांशी बोलताना आज (दि.१४) येथे केले.
आ. सदाभाऊ खोत म्हणाले, गेले अनेक वर्षे आम्ही तालुक्यात प्रस्थापितांच्या विरोधात संघर्ष करत आलो आहे. आम्हाला संघर्ष नवा नाही. त्यामुळे कोण आमच्या सोबत आले तर त्याचे आम्हाला काही वाईट वाटण्याची गरज नाही. सवत घरात आली म्हणून कोणी घर सोडून जात नाही. आम्ही जिथे काम करत आहोत ते निष्ठेने करीत आहोत. आमची आमच्या पक्षावर निष्ठा आहे. त्यामुळे सरकारमध्ये कोण आले आणि कोण गेले तरी आम्हाला काही फरक पडत नाही.
जयंत पाटील यांच्यावर टीका करताना आ. खोत म्हणाले, ज्यांनी चाळीस वर्षे सत्ता व वीस वर्षे मंत्री पद भोगले त्यांनी तालुक्यात विरोधकांना करायला एकही काम शिल्लक ठेवायला नको होते. मात्र आज तालुक्यात जो काही विकास झाला आहे, तो केवळ महायुतीमुळे झाला आहे. मात्र, ज्यांनी आंधळ्याचे सोंग घेतले आहे. त्यांना विकास काय दिसणार आहे. त्यासाठी मन शुद्ध असावे लागते. त्यांनी 40 वर्षात जेवढा निधी आणला नाही, त्याहून अधिक निधी महायुतीच्या सत्ता काळात तालुक्यात आला आहे. त्यांच्या साखर कारखान्याचा आयकर ही केंद्र सरकारने माफ केला आहे.
यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, जिल्हा बँकेचे संचालक राहुल महाडिक, माजी नगराध्यक्ष चिमण डांगे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, भाजपचे विक्रम पाटील, माजी उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, माजी नगरसेवक विश्वनाथ डांगे, कपिल ओसवाल, नगरसेवक अमित ओसवाल, अजित पाटील, राजवर्धन पाटील, रघुनाथ कोळेकर, सतीश पाटील,घनश्याम जाधव उपस्थित होते.