

ऐतवडे बुद्रुक : येथील ग्रामपंचायत व आरोग्य विभागाने तत्काळ सार्वजनिक विहिरीतील पाण्याचे नमुने घेतले. ते तपासणीसाठी संबंधित विभागाकडे पाठवले आहेत. दैनिक पुढारीच्या वृत्ताची दखल घेऊन प्रशासनाने तत्काळ अंमलबजावणी केली.
नदीवरून पाणीपुरवठा तांत्रिक अडचणीमुळे बंद आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून या विहिरीवरून पाणीपुरवठा सुरू केला आहे. सार्वजनिक विहीर परिसरात मोठ्या प्रमाणात भाजीपाला व ऊस पिकाचे क्षेत्र आहे. या पिकांच्या जास्त उत्पादन वाढीसाठी रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. त्याच शेतातील पाण्यामध्ये मिसळलेल्या रासायनिक खताची मात्रा विहिरीच्या पाण्यामध्ये उतरत असल्याचे ग्रामस्थांमधून बोलले जात आहे.
अनेक ग्रामस्थांना या पाण्यामुळे घशाचा त्रास सुरू झाला आहे. त्यामुळे अनेक ग्रामस्थांच्या मागणीचा विचार करून दैनिक पुढारीने वृत्त प्रसिद्ध केले होते. याची दखल घेऊन सरपंच सुभाष कुंभार यांनी तत्काळ आरोग्य विभागाचे कर्मचारी व पाणीपुरवठा कर्मचारी यांना सार्वजनिक विहिरीतील पाण्याचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठवण्याच्या सूचना दिल्या. रविवारी सरपंच कुंभार यांच्या उपस्थितीत कर्मचाऱ्यांनी पाण्याचे नमुने घेतले आणि ते संबंधित विभागाकडे तपासणीसाठी पाठवले. या विहिरीबरोबरच इतर चार ते पाच विहिरींतील पाण्याचेही नमुने घेण्यात आले आहेत. लवकरच तपासणीचा अहवाल येईल, असे डॉ. संदीप कोडग यांनी सांगितले.