विठ्ठल भोसले
देवराष्ट्रे : चालू हंगामात मेच्या मध्यापासून सुरू झालेला पाऊस ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत सुरूच राहिला होता. मात्र याचा द्राक्ष पिकाला मोठा फटका बसल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यात 28 हजार 846 हेक्टर क्षेत्रावरती द्राक्ष पीक आहे. मात्र पावसाने यापैकी तब्बल 20 हजार 628 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. सततच्या विपरित नैसर्गिक परिस्थितीचा फटका बसल्याने अनेक बागांना मालच आला नाही, तर अनेक बागांना अतिशय कमी माल आलेला आहे. बागा कशा जगवायच्या, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. चार हंगामामध्ये सातत्याने फटका बसत असल्याने द्राक्ष उत्पादक कर्जबाजारी झाला आहे. अनेक शेतकऱ्यांनी द्राक्षबागांवर कुऱ्हाड चालवून बागा काढून टाकण्यास सुरुवात केली आहे.
जिल्ह्याच्या अनेक भागात द्राक्ष पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे. यामध्ये प्रामुख्याने तासगाव, जत, कवठेमहांकाळ, खानापूर, पलूस या तालुक्यांमध्ये द्राक्षाचे क्षेत्र जास्त आहे. जिल्ह्यात द्राक्षाचे दर्जेदार उत्पन्न घेतले जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातून द्राक्षांची मोठ्या प्रमाणात निर्यात होत आहे. यावर्षी मे महिन्याच्या मध्यास पावसाला सुरुवात झाली. हा पाऊस ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत कमी-अधिक प्रमाणात सुरू होता. त्यामुळे द्राक्षबागांना आवश्यकतेपेक्षा कमी ऊन मिळाले. याचा परिणाम द्राक्षवेलींवर झाला, यातून द्राक्षकाड्या परिपक्व झाल्या नाहीत. यामुळे ऑक्टोबर छाटणीनंतर बागांना कमी प्रमाणात माल आला आहे, तर अनेक बागा वाया गेल्याचे दिसून येत आहे. यामध्ये पांढऱ्या वाणांच्या बागांचा अधिक समावेश आहे. चार वर्षांपासून द्राक्ष उत्पादकांना विपरित नैसर्गिक परिस्थितीसह अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादकांना कोट्यवधी रुपयांचा फटका बसलेला आहे. शेतकरी कर्जबाजारी झाला असून अनेक शेतकऱ्यांनी द्राक्षबागांवर कुऱ्हाड चालवून बागा काढून टाकल्या आहेत.
चालू हंगामामध्ये द्राक्षकाडी परिपक्व न झाल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी आगाप द्राक्ष छाटणीला बगल दिल्याने ऑक्टोबरमध्ये मोठ्या प्रमाणात द्राक्ष छाटणी घेण्यात आली आहे. आगाप बागांना चांगला दर मिळण्याचा अंदाज आहे. मागास छाटलेल्या बागांना माल कमी आल्याने किंवा मालच आला नसल्याने हंगामाच्या शेवटीही मालाला दर चांगला मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.