Gopichand Padalkar Nomination Rejected  Pudhari
सांगली

Gopichand Padalkar Nomination Rejected | सांगली जिल्हा बँक निवडणूक : आमदार गोपीचंद पडळकरांचा अर्ज अवैध

Sangli District Bank Election | माजी आमदार विक्रम सावंत व बाजार समितीचे माजी सभापती सुजय शिंदे यांची उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिका

पुढारी वृत्तसेवा

Gopichand Padalkar Nomination Rejected

​सांगली : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत जत ‘अ’ सोसायटी गटातून आमदार गोपीचंद पडळकर यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरल्याने त्यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे. कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये झालेल्या सुनावणीत हा निर्णय देण्यात आला आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत संचालक होण्यासाठी आमदार पडळकरांनी गेल्या काही महिन्यांपासून जोरदार तयारी केली होती. बँकेच्या कारभारावर जोरदार आरोप करीत त्यांनी रान उठवले होते. बँकेने भरती जाहीर केल्यानंतर त्यांनी सरकारकडून दबाव आणून या भरतीला स्थगिती आणली होती. तसेच बँकेच्या आजी-माजी संचालकांनी गैरकारभार केल्याचा आरोप करीत सरकारला निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्यास भाग पाडले होते. या समितीने आजी-माजी संचालकांना क्लीन चिट दिली असली, तरी पडळकरांनी जत विधानसभा मतदारसंघातून सोसायटी गटातून निवडणुकीत उतरण्यासाठी व्यूहरचना आखली होती.

​दरम्यान, पडळकरांनी अर्जासोबत जोडलेल्या कुणीकोणूर सर्वसेवा सहकारी सोसायटीच्या सभासदत्वावर आणि निंबवडे ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेतील संचालकपदाच्या अनुभवावर आक्षेप घेत माजी आमदार विक्रम सावंत व बाजार समितीचे माजी सभापती सुजय शिंदे यांनी कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल केली होती. बँकेच्या उपविधीनुसार संबंधित संस्थेचे दोन वर्षांचे सभासदत्व आणि किमान एक वर्ष व्यवस्थापक समितीवर कामाचा अनुभव असणे आवश्यक असल्याचा दावा त्यांनी केला होता.

​याचिकेमध्ये, २० फेब्रुवारी रोजी कुणीकोणूर येथे जमीन खरेदी केल्याने त्यापूर्वीचे सभासदत्व कोणत्या आधारावर मिळाले, असा सवाल उपस्थित करण्यात आला होता. तसेच निंबवडे पतसंस्थेचे कार्यक्षेत्र गावापुरते मर्यादित असताना तेथील सभासदत्व व संचालकपद पात्र ठरते का, याबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सुरुवातीला ही हरकत फेटाळून अर्ज वैध ठरवला होता, मात्र या निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्यात आले होते.

​न्यायालयाने याचिकाकर्त्यांची हरकत ग्राह्य धरत आमदार पडळकरांनी दाखल केलेले कागदपत्र आणि पुरावे चुकीचे असल्याचे स्पष्ट करत त्यांचा अर्ज अवैध ठरवला. या न्यायालयीन निर्णयामुळे जत ‘अ’ सोसायटी गटातील निवडणुकीचे चित्र बदलले असून, महाविकास आघाडीच्या नेते व कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT