Gopichand Padalkar| ऐन दुष्काळात आमदाराची नवाबशाही

मुख्यमंत्री म्हणतात, उधळपट्टी टाळा, अन् आ.पडळकरांकडून अर्ज दाखल करतानाच लाखोंचा चुराडा
Gopichand Padalkar
Gopichand Padalkar (Pudhari Photo)
Published on: 
Updated on: 

​सांगली : ऐन पावसाळ्यात सांगली जिल्ह्यासह संपूर्ण राज्य दुष्काळाच्या भीषण सावटाखाली होरपळत आहे. विहिरी कोरड्या पडल्या आहेत, पिके जळून खाक झाली आहेत, अन् जनावरांच्या चाऱ्याचा आणि पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. एकीकडे सामान्य शेतकरी पुढील पावसाळ्यापर्यंत जगायचे कसे, या चिंतेत असताना; दुसरीकडे लोकप्रतिनिधींना मात्र या दुष्काळाचे सोयरसुतक नसल्याचे संतापजनक चित्र समोर आले आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर खुद्द मुख्यमंत्र्यांनी ‘मोठे कार्यक्रम करू नका, उधळपट्टी टाळा आणि शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मदत करा’, अशा सक्त सूचना पक्षातील सर्व लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. मात्र, या आदेशाला केराची टोपली दाखवत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जिल्हा बँकेसाठी उमेदवारी अर्ज भरतानाच बुधवारी शेकडो आलिशान गाड्यांचा ताफा, फटाक्यांची आतषबाजी आणि शक्तीप्रदर्शन करत अक्षम्य उधळपट्टी केली.

जिल्हा बँक निवडणुकीसाठी सध्या जोरदार हालचाली सुरू आहेत. इच्छुक उमेदवार अर्ज दाखल करत आहेत. आमदार पडळकर हे झरे (ता. आटपाडी) येथून आलिशान गाड्यांचा ताफा घेऊन जत येथे पोहोचले. तिथून सांगलीत दाखल झाले. या ताफ्यासाठी तब्बल लाखो रुपयांचे इंधन वाया घालवले. दुष्काळाने होरपळणाऱ्या जिल्ह्यात एकीकडे पिण्याच्या पाण्याचे टँकर मागण्यासाठी रांगा लागल्या आहेत, तर दुसरीकडे आमदारांच्या मिरवणुकीत सजवलेल्या दोन बैलगाड्या आणि मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाण्यासाठी अश्रू असताना लोकप्रतिनिधींची ही नवाबशाही पाहून उपस्थित सर्वसामान्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.

एकीकडे ही उधळपट्टी सुरू असताना, बँकेच्या आवारात त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी अत्यंत आक्षेपार्ह आणि हुल्लडबाजी करणारी घोषणाबाजी केली. त्यामुळे बँकेच्या आवारात काही काळ तणाव निर्माण झाला होता. या सर्व प्रकाराबाबत जेव्हा पत्रकारांनी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर फटाके उडवण्याबाबत प्रश्न विचारला, तेव्हा आमदार गोपीचंद पडळकर यांनी ‘फटाके उडवण्यापुरते अजून पैसे आहेत’, असे उद्दामपणाचे उत्तर दिले. लोकप्रतिनिधीच्या या वक्तव्यामुळे बाधित शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले गेले असून, या उत्तरावरत उलट-सुलट प्रतिक्रिया उमटत आहेत.

​मुख्यमंत्र्यांनी दुष्काळात खर्च टाळण्याचे दिलेले आदेश फक्त कागदावरच राहिले का? स्वतःच्याच पक्षाचे आमदार मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेला जाहीरपणे हरताळ फासत असताना शासन यावर गप्प का? ‘फटाके उडवायला पैसे आहेत’, असे सांगणाऱ्या आमदारांना मुख्यमंत्री तातडीने समज देणार का, की या उधळपट्टीकडे नेहमीप्रमाणे डोळेझाक करणार? असा सवाल सांगलीतील दुष्काळग्रस्त जनता आणि बळीराजा विचारत आहे.

शेतकऱ्याचा ‘टकाटक’ वेश आणि हाती चाबूक

पडळकरांनी वेश शेतकऱ्याचा केलेला. हातात चाबूक. बैलगाडीच्या अवती-भवती अर्थातच आलिशान गाड्यांचा ताफा होता ताफा. त्यामुळे वाहतूक जाम झाली. इतरवेळी कोठे असतात कोण जाणे, मिरवणुकीला मात्र वाहतूक पोलिस निरीक्षकासह पंधरावर पोलिस, शिवाय बाकीचे पोलिसही रस्त्यावर शेतकऱ्याच्या वेशातील नेत्याच्या संरक्षणासाठी. बैलगाडी बँकेजवळ आली, तर सुमारे पंधरा मिनिटे औट (फटाके) उडत होेते. सलग पंधरा मिनिटे धूर आणि धूळ. यावर प्रदूषण नियंत्रण मंडळ‍ काय करणार? वाहतुकीचा बोजवारा उडालेला, पोलिस काय करणार?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news