डफळापूर येथे एका घरात स्फोट 
सांगली

सांगली : डफळापूर येथे स्फोट; घर, दुकानाचे नुकसान

पुढारी वृत्तसेवा

जत : डफळापूर (ता. जत) येथे एका घरात स्फोट झाल्याची घटना घडली. या स्फोटात दोनमजली इमारत व त्याच्या शेजारी असलेल्या दोन दुकानांचे मोठे नुकसान झाले. इमारतीतील शौचालयाच्या टाकीत जमा झालेल्या मिथेल वायूच्या गळतीमुळे हा स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. बॉम्बशोधक पथक व श्वानपथकाने घटनास्थळी पाहणी केली. या स्फोटात लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. जीवितहानी मात्र झाली नाही.

याबाबतची अधिक माहिती अशी, डफळापूर बाजारपेठेत राजू मलाप्पा ऐकुंडी यांचे दुमजली घर आहे. या घरात शनिवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास भीषण स्फोट झाला. स्फोटाच्या आवाजाने अख्खे गाव जागे झाले. स्फोट इतका भीषण होता की, संपूर्ण दुमजली इमारतीला तडे गेले. दुसर्‍या मजल्यावरील पत्रेही उडून गेले. शिवाय खाली असलेल्या दुकानाचे शटर उचकटून समोरील रफिक इलाई अत्तार यांच्या स्टेशनरी दुकानावर आदळले. त्यामुळे दुकानाचे शटर आणि फर्निचरचे नुकसान झाले. त्याला लागून असलेल्या अमजद बादशहा अत्तार यांच्या दुकानाच्या इमारतीचेही नुकसान झाले.

प्रारंभी गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. स्फोट झालेल्या ठिकाणी गर्दी झाली. घटनेची माहिती मिळताच जत पोलिस घटनास्थळी दाखल झाले. संपूर्ण पाहणी केल्यानंतर शौचालयातील ड्रेनेजमधील वायूगळतीमुळे स्फोट झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला. तरीही खबरदारी म्हणून सकाळी श्वानपथकास पाचारण करण्यात आले होते. ते परिसरातच घुटमळले. तसेच सांगलीहून आलेल्या बॉम्बशोधक पथकानेही पाहणी केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT