विटा : पुढारी वृत्तसेवा भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य ब्रम्हानंद पडळकर यांच्या गाडीला विट्यात भीषण अपघात झाला. या अपघात ब्रम्हानंद पडळकर जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
आमदार गोपीचंद पडळकर यांचे मोठे बंधू ब्रम्हानंद पडळकर यांच्या गाडीला विटा-कुंडल रस्त्यावर अपघात झाला. त्यांच्या एका कार्यकर्त्याच्या मुलीच्या साखरपुड्यासाठी जात असताना मालवाहू पिकअप टेम्पो आणि पडळकर यांच्या गाडीची समोरासमोर धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की, यात ब्रम्हानंद पडळकर यांच्या गाडीच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला आहे. तर पिकअप गाडीच्या समोरील भाग चक्काचूर झाला. या अपघातात ब्रम्हानंद पडळकर जखमी झाले आहेत.
ब्रह्मानंद पडळकर हे स्वतः गाडी चालवत होते. त्यांच्यासह अन्य तिघेजण जखमी झाले आहेत. ब्रम्हानंद पडळकर यांना तातडीने विट्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पिकअप गाडीतील चालकही जखमी झाला आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळे जिल्ह्यातील विटा-कुंडल रोडवर वाहतूक विस्कळीत झाली होती.
जखमींना विट्याच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, आमदार गोपीचंद पडळकर हे आपला साताऱ्याचा दौरा सोडून विट्याकडे परतले आहेत. त्यांनी रुग्णालयात येऊन जखमींची विचारपूस केली. यावेळी माजी नगरसेवक अमोल बाबर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर, भाजपचे तालुकाध्यक्ष सुहास पाटील, शंकर मोहिते, विनोद पाटील आदी उपस्थित होते.