विटा : विटा पोलिस स्टेशनमधील एक कर्मचारी संशयितांची गोपनीय माहिती लोकप्रतिनिधींना देतो, त्यामुळे त्यांच्याकडून अनेक प्रकरणात हस्तक्षेप होत आहे, त्यामुळे विटा पोलीस ठाण्याच्या संबंधित पोलीस कर्मचाऱ्याची खातेनिहाय चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी भाजपचे जिल्हा सरचिटणीस पंकज दबडे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना भेटून केली आहे. त्यामुळे सत्ताधारी महायुती तील भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्या तला स्थानिक विसंवाद चव्हाट्यावर आला आहे.
विटा पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी अमोल पाटील यांच्या विरोधात स्थानिक भाजपाचे पदाधिकारी चांगलेच आक्रमक झाले आहेत. भाजपचे जिल्हा सरचिटणीस पंकज दबडे अनुसूचित जाती सेलचे संदीप ठोंबरे खानापूरचे नगरपंचायतीचे गट नेते मारुती भगत अध्यात्मिक आघाडीचे संतोष यादव आदी पदाधिकाऱ्यांनी आज शुक्रवारी विट्यात पत्रकार बैठक घेतली. त्त्यांनी थेट नाव घेत आरोपांच्या फैरी झाडल्या. ते म्हणाले, विटा पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी अमोल पाटील याचा कारभार वादग्रस्त आहे. हा कधी ही पोलीस वर्दीत नसतो. विटा पोलीस ठाणे अंतर्गत अनेक प्रकरणांची तो थेट स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणजे खानापूर मतदारसंघाच्या आमदारांना फोन करून गोपनिय माहिती देतो परिणामी अनेक गुन्ह्यांची प्रकरणे बाहेरच्या बाहेर रफादफा होत आहेत.
त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह लागत आहे. अनेक प्रकरणात तर तो सरळ सरळ दलाली करीत आहे. कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात असता नाही त्याने असेच प्रकार केले होते. या प्रकारांना कंटाळून अनेक पोलिसांनी बदल्यांचे अर्ज दाखल केले आहेत. वास्तविक आम्ही चांगल्या पोलीस किंवा अधिकाऱ्यांच्या कायमच मागे असतो. परंतु हा कर्मचारी बराच उपद्व्यापी आहे. एका वर्षात ३ पोलीस ठाणी त्याला कशी मिळाली ? त्याच्या मोबाईल्सचे कॉल डिटेल्स काढा, त्याच्यावर कोणाचा राजकिय वरदहस्त आहे ? याचीही चौकशी करा अशी मागणी आम्ही जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून केली आहे, तसेच या प्रकरणी गरज पडल्यास आमदार गोपीचंद पडळकर यांना घेऊन मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही भेटणार आहोत असेही पंकज दबडे मारुती भगत आणि संदीप ठोंबरे यांनी सांगितले.