विटा : पुढारी वृत्तसेवा : बलवाडी फाट्यावर चारचाकी आणि दुचाकीची धडक होऊन एका महिला पोलिसाचा जागीच मृत्यू झाला. प्रितंका अनंत पोटे (वय ३२, रा. देवराष्ट्रे, ता. कडेगाव) असे महिला पोलिसाचे नाव आहे. ही घटना आज (दि.४) पहाटे साडे पाचच्या सुमारास बलवडी फाटा येथे घडली. याबाबत प्रितंका यांचे दीर सागर सर्जेराव लोंढे यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी की, प्रितंका अनंत पोटे तथा प्रितंका संतोष लोंढे या तुरची येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात मैदानी खेळाच्या प्रशिक्षक म्हणून कार्यरत होत्या. मंगळवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास देवराष्ट्रे येथून त्या तुरची येथे पोलिस प्रशिक्षण केंद्र येथे दुचाकीवरून (एम एच १० डी एच ९९०६) निघाल्या होत्या. सकाळी पावणे सहाच्या दरम्यान त्यांचे पती संतोष यांना त्यांचे मित्र अक्षय शिंदे यांनी फोनवरून अपघाताची माहिती दिली.
यानंतर प्रितंका यांच्या नातेवाईकांनी तातडीने बलवडी फाट्याकडे धाव घेतली. त्यावेळी बलवडी फाट्यावर प्रितंका यांची दुचाकी आणि चारचाकी (एम एच १० इ के ०६१४) यांचा भीषण अपघात झाला होता. हा अपघात इतका भीषण होता की, डोक्याला गंभीर इजा झाल्याने प्रितंका जागीच ठार झाल्या होत्या. तर पोटे यांच्या दुचाकीसह चारचाकी गाडीचे देखील मोठे नुकसान झाले. प्रितंका या कडेपूर रस्त्यावर पडल्या होत्या.
दरम्यान अपघातातील चारचाकी चालक उदय रामचंद्र पवार (वय ३६, रा. रेठरे हरणाक्ष, ता. वाळवा, जि. सांगली) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विटा पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा पंचनामा केला. तर प्रितंका यांचा मृतदेह पलूस येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस तपास करत आहेत.