आटपाडी; पुढारी वृत्तसेवा : आटपाडी शहराच्या मध्यवस्तीतील स्वातंत्र्यपूर्व काळातील औंध संस्थांनकालीन सरकारवाड्यास (Atpadi Sarkarwad) आज (दि.११) सकाळी आग लागली. नगरपंचायतच्या कर्मचाऱ्यांनी आणि फायर बुलेटने ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. परंतु, जुनी पडलेली इमारत आणि अडगळीची जागा असल्याने आग पूर्णतः विझली नाही. त्यानंतर अग्निशमन दलाच्या बंबाने आग विझविण्यात आली. (Sangli News)
स्वातंत्रपूर्व काळात आटपाडी महाल होता. शतकापूर्वी बांधलेल्या या वाड्यात औंधचे राजे रहायचे आणि महालाचे कामकाज पाहणारे अधिकार रहायचे. संस्थानचा कारभार देखील या इमारतीतून चालायचा. गुन्हेगारांना ठेवण्यासाठी छोटेखानी तुरुंग या वाडयासमोर आहे. आटपाडी तालुक्याची निर्मिती झाल्यावर या वाड्यात तहसीलदारांचे निवास स्थान होते. तर तुरुंगाच्या खोल्यात दुयम निबंधक कार्यालय होते. मूळ वाडा मोडकळीस आल्यावर तहसीलदारांनी येथे राहायचे बंद केले. चार वर्षांपूर्वी दुयम निबंधक कार्यालय मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत स्थलांतरीत झाले.
त्यामुळे वाड्याकडे दुर्लक्ष झाले. सततच्या पडझडीने वाड्याची दुरवस्था झाली आहे . रात्री या वाड्यात नशेबाजांची वर्दळ असते. त्यांच्यापैकी कोणीतरी सिगारेट किंवा चिलीम न विझवता टाकल्याने लाकडी बांधकाम असलेल्या वाड्यास आग लागल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
आग लागल्याचे सकाळी सहा वाजता निदर्शनास आले. दगडी बांधकाम आणि पहिल्या मजल्यावर लाकडांचा वापर केला होता. काही लाकडे रचून ठेवण्यात आली होती. त्यामुळे आग लागली.
सरकार वाड्याचा मोठा परिसर आहे. हा वाडा पाडून या जागेत नगरपंचायतची इमारत किंवा उद्यान -बागबगीचा करावा, अशी मागणी होत आहे. शासनाने आणि लोकप्रतिनिधीनी त्यासाठी पाठपुरावा करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.