‘एक गाव एक गणपती’ उपक्रम 
सांगली

सांगली : अग्रण धुळगावात 25 वर्षांपासून ‘एक गाव एक गणपती’ उपक्रम

पुढारी वृत्तसेवा

कवठेमहांकाळ : अग्रण धुळगाव (ता. कवठेमहांकाळ) येथे गेली पंचवीस वर्षे ‘एक गाव एक गणपती’ उपक्रम राबविला जात आहे. त्यामुळे पर्यावरणाचेही रक्षण होत असून, या गावचा आदर्श इतर गावांनी घेण्याची गरज आहे.

या उपक्रमाची सुरुवात 2000 मध्ये झाली. तत्कालीन पोलिस निरीक्षक विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील सर्व तरुण मंडळींनी एकत्र येऊन ‘एक गाव एक गणपती’ची संकल्पना राबविली. यावर्षी हनुमान मित्र मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर भोसले यांनी, 2024 हे रौप्य महोत्सवी वर्ष असल्याने ‘एक गाव एक गणपती’ मोठ्या उत्साहात साजरा करू, असे सांगितले.

गावातील श्री. एम. के. जाधव हायस्कूलमध्ये गणपती बनविण्याची कार्यशाळा आयोजित करून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनविण्यात आल्या. हनुमान मित्र मंडळाचे अध्यक्ष भोसले, छत्रपती स्पोर्टस् क्लब अध्यक्ष बाळासाहेब भोसले, नरसिंह कला, क्रीडा संस्कृती मंडळाचे अध्यक्ष सुहास भोसले अशा गावातील तीन मंडळांना सर्व ग्रामस्थांच्यावतीने मान्यता देण्यात आली. तीन मंडळांमध्ये चिठ्ठी टाकून प्रथम मान देण्यात आला होता. यावेळी भानुदास भोसले, अधिक जाधव, बापूसाहेब भोसले, भारत पाटील, भागवत जगताप, प्रतापसिंह भोसले, बाळासाहेब गुरव, सचिन भोसले, मोहन भोसले व गावातील इतर तरुण उपस्थित होते.

गणेशोत्सवात महिलांसाठी ‘होम मिनिस्टर खेळ पैठणी’चा कार्यक्रम घेण्यात आला आहे. तसेच मुलांसाठी वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, गौरी-गणपती सजावट स्पर्धा, कीर्तन सोहळा अशा स्पर्धा व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

अग्रण धुळगाव गावचा मला अभिमान आहे. शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून यावर्षीचा ‘एक गाव एक गणपती’ उत्सव आनंदात साजरा करणार.
भारती चौगुले, उपसरपंच, ग्रा.पं., अग्रण धुळगाव

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT