जत : तालुक्यातील जत-शेगाव रस्त्यावर अचकनहळळी फाट्याजवळ ट्रॅक्टरला दुचाकीने पाठीमागून जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना शनिवार, दि. 27 रोजी रात्री 8 वाजता घडली.
अक्षय ज्ञानदेव निकम (वय 25, रा. शेगाव, ता. जत) असे मृताचे नाव आहे, तर विशाल सपताळ (रा. अंत्राळ, ता. जत) व आदित्य कोडग (वय 23, मूळ रा. आवंढी, सध्या मुंबई) हे गंभीर जखमी झाले. विशाल सपताळ याला पुढील उपचारासाठी सांगली येथे हलविण्यात आले आहे. आदित्य कोडग याच्यावर जत शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, अक्षय निकम हा खिडक्यांच्या स्लायडिंग बनविण्याचा व्यवसाय करत होता. दोन-तीन महिन्यांपूर्वी त्याने जत येथे स्वतःचे दुकान सुरू केले. विशाल सपताळ हा त्याच्या दुकानात काम करत होता, तर मावस भाऊ आदित्य कोडग हा नाताळच्या सुटीनिमित्त दोन दिवसांपूर्वी आवंढी येथे गावी आला होता. शनिवारी सायंकाळी तिघेही दुकान बंद करून दुचाकीवरून गावाकडे निघाले होते. जत-शेगाव रस्त्यावर जतपासून अर्धा किलोमीटर अंतरावर समोरील ट्रॅक्टर अचकनहळळीच्या दिशेने वळण घेत असताना त्यांच्या दुचाकीची ट्रॅक्टरला पाठीमागून जोराची धडक बसली. अपघातात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने अक्षय निकम याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच जत पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पंचनामा केला. रात्री उशिरापर्यंत घटनेची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.