वीज पडून तरुणाचा मृत्यू  
सांगली

सांगली : अंगावर वीज पडून तरुणाचा मृत्यू

पुढारी वृत्तसेवा

मांजर्डे : बलगवडे (ता. तासगाव) येथे पाऊस सुरू असताना अंगावर वीज पडून गौरगाव येथील रोहित विठ्ठल यलमार (वय 25) या तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. 8) दुपारी घडली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, गौरगाव येथील रोहित यलमार हा आपल्या मित्रासह दुचाकीवरून तासगावला निघाला होता. तो बलगवडे येथे आला असता विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू झाला. पावसात भिजू नये, यासाठी त्याने झाडाचा आश्रय घेतला होता. ढगांचा गडगडाट होत अचानक रोहितच्या अंगावर वीज कोसळली. तत्काळ त्याला उपचारासाठी तासगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तत्पूर्वी त्याचा मृत्यू झाला होता. घटनेची तासगाव पोलिसात नोंद झाली आहे. रोहित याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, लहान मुलगा असा परिवार आहे. रोहित आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. घटनेची माहिती समजताच कुटुंबीयांनी हंबरडा फोडला. गावात सर्वत्र शोककळा पसरली होती.

उत्तरीय तपासणीसाठी तीन तास प्रतीक्षा

घटना दुपारी तीन वाजता घडली. त्यानंतर तासगाव येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे उत्तरीय तपासणीसाठी वेळ झाला. जवळपास तीन तासाच्या प्रतीक्षेनंतर वैद्यकीय अधिकारी आल्यानंतर मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आल्याचा आरोप नातेवाईक व ग्रामस्थांनी केला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT