सांगली ः राज्य परीक्षा परिषदेमार्फत दि. 8 फेब्रुवारी 2026 रोजी घेण्यात येणारी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती (इयत्ता पाचवी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती (इयत्ता आठवी) या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. ही परीक्षा आता दि. 22 फेब्रुवारी 2026 रोजी घेण्यात येणार आहे. राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.
राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने पुढीलवर्षी दि. 8 फेब्रुवारी 2026 रोजी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. पाचवी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. आठवी) राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी आयोजित केली होती. मात्र, केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डातर्फे केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटी) दि. 8 फेब्रुवारी 2026 रोजी आयोजित केली आहे. या परीक्षेस राज्यातील अनेक प्राथमिक व माध्यमिक शिक्षक प्रविष्ट झालेले आहेत. त्यामुळे याच तारखेला राज्यात होणाऱ्या पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख बदलण्याची मागणी शिक्षकांच्यावतीने करण्यात आली होती. शिक्षकांना सीटीईटी परीक्षा देता यावी, याकरिता पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा, दि. 8 फेब्रुवारीऐवजी दि. 22 फेब्रुवारी 2026 रोजी घेण्यात येणार आहे, असे राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त ओक यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.