विटा: विटा शहरासाठी ४३ कोटींची नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे. त्यामुळे विट्याच्या पाणी योजनांचा प्रवास हा येरळा ते कृष्णा आणि पुन्हा येरळा नदी असा होणार आहे. विटा शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी १९९८ पूर्वी येरळा नदीतून सायफनने अर्थात उताराने पाणी आणणारी योजना सुरू होती. त्यावेळच्या लोकसंख्येनुसार ती तयार करण्यात आली होती.
कडेगाव तालुक्यातील नेवरी गावाजवळील येरळा नदीत जॅकवेलमधून पाणी उचलून थेट विट्यात आणले जात होते. या योजनेसाठी लोखंडाच्या आणि बिडाच्या जलवाहिन्या वापरल्या होत्या. मात्र, त्यानंतर शहराची वाढती लोकसंख्या पाहून विटा पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी कृष्णेचे पाणी मिळाले पाहिजे, असा आग्रह धरत १९९८ मध्ये घोगाव (ता. पलूस) गावाजवळील कृष्णेच्या पात्रातून योजना तयार केली. त्यानंतर येरळा योजनेच्या लोखंडी आणि बिडाच्या जलवाहिन्या काढून भंगारात घालण्याचे काम केले. मात्र, गेल्या पाच वर्षात पुन्हा शहराच्या लोकसंख्येत वाढ झाली. परिणामी नवीन पाणीपुरवठा योजनेची गरज भासू लागली.
दरम्यान, गेल्या २ वर्षात पाणीपुरवठा अपुरा पडू लागला. याबाबत संबंधितांकडे तक्रार केली असता पदाधिकारी विरुद्ध पालिकेच्या प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी असा संघर्ष सुरू झाला. सद्यस्थितीला घोगाव पाणी योजना २५ वर्षे जुनी झाली आहे. २० किलोमीटरपर्यंतच्या जलवाहिन्या जीर्ण झाल्याने वारंवार फुटतात. त्यामुळे पाणी वेळेवर आणि पुरेसे येत नाही, अशी कारणेही पालिकेकडून सांगितली जात आहेत. त्यामुळे आता पुन्हा केंद्र सरकारच्या अमृत २.० योजनेतर्गंत येरळा नदीतील वाझर बंधाऱ्यातून योजना सुरू केली जाणार आहे. त्यामुळे पाणीपुरवठा योजनांचा प्रवास हा येरळ्यातून कृष्णा आणि कृष्णेतून पुन्हा येरळा असा होणार आहे.
विटा पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. विक्रम पाटील म्हणाले की, केंद्र शासन पुरस्कृत अमृत २.० योजनेअंतर्गत या सुधारीत पाणी पुरवठा योजनेचा सविस्तर प्रकल्प अह वाल तयार करण्याचा ठराव ११ जुलैच्या बैठकीत करण्यात आला आहे. येरळेच्या वाझर बंधाऱ्यातून पाणी विटा शहरासाठी आणणार आहोत. त्यासाठी साधारणपणे ४३ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. याबाबत जिओ कंपनीला सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम दिले आहे. काही दिवसांतच त्याचे अॅग्रीमेंट पूर्ण होईल.
हेही वाचा