Selection will be made for the new director of Sangli District Bank
सांगली जिल्हा बँकेच्या नवीन संचालकसाठी निवड होणार Pudhari File Photo
सांगली

संचालक सरदार पाटील यांचा राजीनामा मंजूर

पुढारी वृत्तसेवा

जिल्हा बँकेचे तज्ज्ञ संचालक सरदार पाटील यांचा राजीनामा शनिवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. त्यांच्या रिक्त जागेवर काँग्रेसकडून अद्याप नाव आलेले नाही. नवीन नाव आल्यानंतर स्वीकृत संचालकाची निवड होणार आहे.जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची बैठक अध्यक्ष आमदार नाईक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत स्वीकृत संचालकासह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. जिल्हा बँकेत दोन स्वीकृत संचालक घेतले जातात. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्याकडे प्रत्येकी एक संचालक पद आहे. राष्ट्रवादीचे मनोज शिंदे-म्हैसाळकर, तर काँग्रसचे जत तालुक्यातील सरदार पाटील संचालक आहेत. काँग्रेसचे सरदार पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपचे काम केल्याने त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी नूतन खासदार विशाल पाटील यांची मागणी होती. जतचे आमदार विक्रमसिंह सावंत यांनी सरदार पाटील यांना राजीनामा देण्याची सूचना दिली होती. त्यानुसार सरदार पाटील यांनी जिल्हा बँकेकडे राजीनामा दिला होता.

संचालक मंडळाच्या बैठकीत स्वीकृत संचालक पाटील यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला. त्यांच्या रिक्त झालेल्या पदावर काँग्रेसकडून नाव सुचवले जाणार आहे. त्यामुळे त्यांच्याकडून नाव आल्यानंतर संचालक मंडळाच्या बैठकीत नूतन स्वीकृत संचालकाची निवड केली जाईल, असे बँकेचे अध्यक्ष आमदार नाईक यांनी सांगितले. दरम्यान, स्वीकृत संचालक पदासाठी इच्छुकांची संख्या मोठी आहे. माजी मंत्री डॉ. विश्वजित कदम, खासदार विशाल पाटील, जिल्हाध्यक्ष आमदार विक्रमसिंह सावंत हे कोणाची निवड करायची याबाबत निर्णय घेणार आहेत. त्यामुळे रिक्त जागेवर कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता लागली आहे.

संचालक निवड विधानसभेच्यादृष्टीने महत्त्वाची

विधानसभेची निवडणूक जवळ आलेली आहे. सर्वच मतदारसंघात इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या उमेदवारांना मदत होण्याच्यादृष्टीने जिल्हा बँकेतील तज्ज्ञ संचालक पदावर संधी दिली जाणार आहे. त्यात कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता आहे.

SCROLL FOR NEXT