विटा : रेणावी एसटी अपघातातील मृतांच्या कुटुंबी यांना प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत जाहीर केली. मात्र ही मदत महाराष्ट्र शासनाच्या स्वतंत्र निधीतून दिली जाणार का विमा कंपनीकडून मिळणारीच रक्कम सरकारची म्हणून देणार, असा रोखठोक सवाल महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने केला आहे.
१३ ऑगस्ट रोजी रेणावी घाटात राज्य परिवहन महामंडळाच्या दोन एसटी बसमध्ये मोठा अपघात झाला. यात एक पुरुष आणि महिला तसेच एका कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. या अपघातानंतर परिवहन मंत्र्यांनी स्थानिक आमदार सुहास बाबर यांच्याशी चर्चा करताना मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत करणार तसेच जखमींचा सगळा खर्च महाराष्ट्र शासन करेल असेही जाहीर केले आहे.
आता ही मदत कधी मिळणार याच्या प्रतीक्षेत संबंधित असतानाच युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव निखिल सुतार यांनी एक महत्त्वाची माहिती समोर आणली आहे. ते म्हणाले, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना जे तिकीट देतात, त्या तिकीटावर अतिरिक्त एक रुपयाचा प्रवासी अपघात विमा निधी घेतला जातो. असे असताना, रेणावी घाटातील अपघातानंतर मदतीवरून मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.
परिवहन मंत्र्यांनी किंवा आमदार सुहास बाबर यांनी याबाबत स्पष्ट खुलासा करावा. कारण एसटी बसने प्रवास करताना अपघाती मृत्यू झाल्यास अपघात विमा योजनेअंतर्गत १० लाख रुपये, कायमस्वरूपी अपंगत्वासाठी ५ लाख रुपये आणि दुखापतीनुसार १ लाख ते अडीच लाखां पर्यंतचे विमा संरक्षण आहे. हे पैसे म्हणजे प्रवाशांचा कायदेशीर हक्कच आहे. यांत राज्य शासन परिवहन महामंडळ म्हणून काही वेगळी मदत देणार आहे का ? का प्रवासी अपघात विमा योजनेअंतर्गत संबंधित विमा कंपनीकडून मिळणारीच रक्कम सरकारची मदत म्हणून भासवली जात आहे, असा महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
जर शासनाकडून स्वतंत्र आर्थिक मदत दिली जाणार असेल, तर त्याबाबत स्पष्ट घोषणा करून जनतेला माहिती द्यावी, अशी मागणी करत विमा योजनेची रक्कम आणि शासनाची मदत या दोन्ही स्वतंत्र बाबी आहेत की नाही, हे परिवहन मंत्र्यांनी स्पष्ट करावे असे म्हटले आहे. दुर्दैवी अपघातात आपल्या आप्तांना गमावलेल्या कुटुंबीयांच्या भावना अत्यंत संवेदनशील असल्याने सरकारने केवळ घोषणांचा फार्स न करता मदतीचा नेमका स्रोत, विम्याची रक्कम आणि आर्थिक मदतीची नेमकी आकडेवारी याबाबत संपूर्ण पारदर्शकता ठेवावी, अशी ठाम मागणी प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली.