Sangli Accident: रेणावी घाट अपघात; मृतांची संख्या ३ वर

मृतांच्या कुटुंबीयांना शासन प्रत्येकी १० लाख रुपये मदत देणार
Renavi Ghat Accident
Renavi Ghat Accident
Published on
Updated on

विटा : विजापूर-गुहागर राष्ट्रीय महामार्गावर विट्याजवळील रेणावी घाटात दोन एसटी बसेसच्या अपघातातील मृतांचा आकडा तीन झाला आहे. शुक्रवारी सकाळी विट्यातील खासगी रुग्णालयात जखमी साक्षी चंद्रकांत पवार (वय १७) या महाविद्यालयीन विद्यार्थिनीचे निधन झाले. ती बळवंत महाविद्यालयात कला शाखेच्या द्वितीय वर्षात शिकत होती.

दरम्यान, या अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दहा लाख रुपये आणि जखमींचा संपूर्ण उपचार खर्च राज्य शासन करणार असल्याची घोषणा परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी केल्याची माहिती आमदार सुहास बाबर यांनी दिली.

विटा आगाराची विटा ते भिवघाट (एमएच १४, बीटी ३२५५) आणि मेढा आगाराची विजापूर ते मेढा बस (एमएच १४, बीटी ४२७०) या दोन एसटी बसेसचा गुरुवारी सायंकाळी विट्याजवळील रेणावी घाटात अपघात झाला. यात खानापूर येथील नंदा हरिदास त्र्यंबके (वय ६०) आणि बांबवडे (जि. सातारा) येथील धोंडिराम लक्ष्मण पाटील (वय ७८) हे दोघे जागीच ठार झाले होते. या अपघातात एकूण ३८ जण जखमी झाले होते. यापैकी १७ जणांची प्रकृती गंभीर होती. यामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच शाळकरी मुले-मुलींचाही समावेश होता.

विटा येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या साक्षी पवार हिचा शुक्रवारी सकाळी मृत्यू झाला. तिच्या डोक्याला आणि छातीला गंभीर दुखापत झाली होती. साक्षी पवार ही खानापूर तालुक्यातील ऐनवाडी गावची रहिवासी होती. तिची आई इस्त्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवते. साक्षीला एक छोटी बहीण आहे. घरची परिस्थिती अत्यंत हलाकीची असून, साक्षीचे वडील तिच्या लहानपणीच वारले आहेत.

दरम्यान, रेणावी घाटातील एसटी अपघातातील मृतांच्या वारसांना दहा लाख रुपयांची मदत आणि जखमींचा सर्व उपचार खर्च शासन करणार असल्याची घोषणा प्रतापराव सरनाईक यांनी केली आहे. याबाबत आमदार सुहास बाबर यांनी पाठपुरावा केला होता. या अपघातातील सात गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी सांगली, कऱ्हाड व कोल्हापूर येथे हलविण्यात आले असून, १५ जणांवर विट्यात उपचार सुरू आहेत. त्यापैकी नऊजण अतिदक्षता विभागात आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news