अलमट्टी धरण Pudhari File Photo
सांगली

अलमट्टीचा पाणीसाठा कमी करा; अन्यथा जलबुडी आंदोलन

पुढारी वृत्तसेवा

कर्नाटकातील अलमट्टी धरण आणि हिप्परगी बंधारा यामध्ये नियमबाह्य पद्धतीने पाण्याचा साठा केला जात आहे. त्या पाणीसाठ्यावर तातडीने नियंत्रण आणा; अन्यथा जलबुडी आंदोलन केले जाईल, असा इशारा कृष्णा नदी महापूर नियंत्रण समिती आणि आंदोलन अंकुश यांनी शासनाला दिला.

समितीचे समन्वयक सर्जेराव पाटील, निवृत्त अभियंता विजयकुमार दिवाण, निवृत्त अभियंता प्रभाकर केंगार, आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे, दीपक पाटील यांनी राज्याचे मुख्य सचिव यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कर्नाटक शासनाचा जलसंपदा विभाग केंद्रीय जल आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करून भरमसाट पाणीसाठा करीत आहे. पावसाळ्याला आताच सुरुवात असताना, धरणात पाणी साठवून ठेवायचा सपाटा कर्नाटक सरकारने सुरू ठेवला आहे. त्यामुळे कृष्णा खोर्‍यातील सांगली, सातारा आणि कोल्हापूर या तिन्ही जिल्ह्यांना महापुराचा धोका निर्माण होत आहे. याबाबत आम्ही वारंवार जिल्हा प्रशासन, जलसंपदा विभागाचे सांगली व कोल्हापूरमधील कार्यकारी अभियंता कार्यालय यांना निवेदने दिली आहेत, आंदोलने केली आहेत. महापूर परिषदा घेतल्या आहेत. परंतु त्याकडे साफ दुर्लक्ष करण्यात येत आहे. यावरून कृष्णा खोर्‍यातील नागरिकांना आणि शेतकर्‍यांना महापुरामध्ये बुडवण्यासाठीच प्रशासन उत्सुक आहे की काय? अशी शंका येऊ लागली आहे. त्यामुळेच आम्ही 1 ऑगस्टरोजी नृसिंहवाडी येथे पंचगंगा नदीत आणि सांगलीत माई घाटावर कृष्णा नदीत जलबुडी आंदोलन करणार आहोत. याची प्रशासनाने गंभीर दखल घ्यावी, असा इशारा देण्यात आला.

सांगली व कोल्हापूर प्रशासनास याआधीच आम्ही कायदेशीर नोटीस दिली आहे. 26 जुलैपर्यंत वाट पाहून आम्ही त्यांच्यावर खटलाही (जनहित याचिका) दाखल करणार आहोत. महापुराच्या धोक्याबद्दल कर्नाटक सरकारबरोबर संपर्क साधल्याचे दिसून येत नाही. तसेच महापुराचा इशारा देणार्‍या, तो येऊ नये म्हणून खटपट करणार्‍या आणि महापुरावेळी मदत करणार्‍या स्वयंसेवी संस्था, संघटना यांच्याशीही काही संपर्क साधला आहे, असे दिसून येत नाही, असे निवेदनात म्हटले आहे.

सध्या पावसाचा जोर वाढत आहे. नजीकच्या काळात तो आणखी वाढण्याची शक्यता आहे. कृष्णा खोर्‍यातील कोयना, वारणा, राधानगरी या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात यापुढे असाच पाऊस पडत राहिला, तर पाणी वाढणार आहे. अशावेळी अलमट्टी धरण आणि हिप्परगी बंधारा येथील पाणीसाठा नियंत्रित करण्याची गरज आहे. त्यासाठी आतापासूनच या दोन्ही ठिकाणी विसर्ग वाढविण्याचा आग्रह धरला पाहिजे. परंतु उलट अलमट्टी आणि हिप्परगी येथे नियमबाह्यरित्या पाणीसाठा वाढविला जात आहे, असेही निवेदनात म्हटले आहे.

मुख्यमंत्र्यांच्या आदेशाकडे दुर्लक्ष

अलमट्टी धरण आणि हिप्परगी बंधारा येथील पाणी पातळी केंद्रीय जल आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ठेवली जात आहे की नाही, याबाबत बारकाईने देखरेख करा. तसे आढळले नाही, तर तातडीने कर्नाटक प्रशासनाशी संपर्क साधून, पाण्याची पातळी कमी करायचा आग्रह धरा, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये सांगली, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी तसेच जलसंपदा विभागाला दिले होते. परंतु दोन्ही जिल्ह्यांतील जिल्हा प्रशासन तसेच कार्यकारी अभियंते यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट दिसत आहे, असे निवेदनात नमूद केले आहे.

अलमट्टीत आताच 514 मीटरपेक्षा अधिक पाणी पातळी

निवेदनात म्हटले आहे की, अलमट्टी धरणातील पाणी पातळी 31 जुलैअखेर 513.60 मीटर आणि 31 ऑगस्टपर्यंत 517 मीटर असली पाहिजे, असा केंद्रीय जल आयोगाचा निर्देश आहे. प्रत्यक्षात अलमट्टी धरणाची पाणीपातळी आताच 514 मीटरपेक्षा अधिक आहे. धरण जवळजवळ 80 टक्के आताच भरले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT