आटपाडी : चांगभलंच्या गजरात आणि गुलाल खोबऱ्याची उधळण करीत खरसुंडी येथील सिद्धनाथांच्या चैत्र यात्रेतील रथोत्सव उत्साहात संपन्न झाला. भाविकांची गर्दी व उत्साह दुसऱ्या दिवशीही कायम असल्याचे दिसून आले.
आटपाडी तालुक्यातील खरसुंडी येथे शुक्रवारी भाविकांच्या मोठया उपस्थितीत सासनकाठी व पालखी सोहळा संपन्न झाला. आज रथोत्सव सोहळा झाला. सिद्धनाथांच्या सासनकाठी व पालखी सोहळ्याने गुलाबी रंगात रंगलेल्या नाथनगरीत शनिवारी दुपारी तीन वाजता मुख्य मंदिरात विविध धार्मिक विधी झाले. त्यानंतर धुपारतीने पालखीसह उत्सवासाठी प्रस्थान केले. मंदिराच्या समोर विविध प्रकारच्या फुलांनी सजवलेल्या पालखीरथात उत्सव मूर्ती ठेवण्यात आली.
पालखीमध्ये पगडीधारी उत्सव मूर्ती विराजमान करण्यात आली होती. रथाच्या समोर बांधलेल्या दोराला धरुन भाविक रथ ओढत होते. डॉल्बीच्या दणदाटात गुलाल खोबऱ्याची उधळण आणि चांगभलंचा गजर यामुळे रथ ओढणार्या भाविकांचा उत्साह दुणावत होता. चांगभलंच्या जयघोषा बरोबर रथ हळूहळू जोगेश्वरी मंदिराकडे वाटचाल करत होता. चार वाजता जोगेश्वरी मंदिरात मानपान झाल्यानंतर रथ मुख्य मंदिरात पुन्हा परतला. शेवटच्या टप्प्यात पाऊसाने हजेरी लावल्याने भाविकांचा उत्साह दुणावला. दरम्यान, आज सकाळपासून मंदिरामध्ये परिसरातील भाविकांनी गर्दी केली होती.