खरसुंडीत सासनकाठी व पालखी सोहळा उत्साहात संपन्न; चार लाखाहून अधिक भाविकांची उपस्थिती

खरसुंडीत सासनकाठी व पालखी सोहळा उत्साहात संपन्न; चार लाखाहून अधिक भाविकांची उपस्थिती
Published on
Updated on

आटपाडी; पुढारी वृत्तसेवा : चैत्रातल्या रणरणत्या उन्हात नाथबाबांच्या नावानं चांगभलंच्या जयघोषात आणि गुलाल खोबऱ्याच्या मुक्त हस्ते उधळणीत खरसुंडी येथे सिद्धनाथांच्या चैत्र यात्रेत सासनकाठी व पालखी सोहळा उत्साहात पार पडला. यात्रेत सुमारे चार लाखांहून अधिक भाविकांनी नाथनगरीत हजेरी लावली.

महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व कुलदैवत असणाऱ्या खरसुंडी येथील श्री सिद्धनाथ यात्रेसाठी लाखोंच्या संख्येने भाविक खरसुंडीत रविवार (दि. १६) पासूनच दाखल झाले होते. सिद्धनाथ व जोगेश्वरी विवाह सोहळ्यानिमित्त होणारा हा पालखी सोहळा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होती. आपल्या कुलदैवताचे कुलाचार पार पाडण्यासाठी भाविकांच्या गर्दीने श्री पूजकांची निवासस्थाने फुलून गेली होती. रविवारी मध्यरात्री पासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांग लावली होती. या सोहळ्यामध्ये चैत्र वद्य दशमीला देवाची लोखंडी सासने धावडवाडीचे मुस्लिम व विठलापूरचे बाड यांनी स्नानासाठी घोडेखूर येथे नेली. त्यानंतर ती जोगेश्वरी मंदिरात परत आणली.

आज (दि. १७) सकाळी सासनकाठी व पालखी ने मिरवणुकीच्या सोहळ्यास सुरवात झाली. पहाटे मुख्य मंदिरात अभिषेक झाल्यानंतर श्री सिद्धनाथ व जोगेश्वरी देवीची पूजा बांधण्यात आली होती.देवाला भरजरी फेटा,अंगरखा, हातात तलवार तर देवीला लाल साडी, सौभाग्य अलंकार अशी सालंकृत पूजा भाविकांना तृप्त करणारी ठरली.

सकाळी नऊ वाजता नित्योपचाराप्रमाणे धुपारती मध्ये आठवडाभर मंदिरात सेवा करणारे भाविक मोठया संख्येने सहभागी झाले होते.अकरानंतर गावोगावच्या सासनकाठ्या मुख्य मंदिरात दाखल होऊ लागल्या. मंदिराच्या आवारात सासनकाठया आल्यानंतर पारंपरिक वाद्यांच्या तालावर नाचवण्यात येत होत्या.

यावेळी दर्शनासाठी आलेले भाविक सासनकाठीवर गुलाल व खोबऱ्याची मुक्त उधळण करीत होते.एक वाजता आटपाडीच्या पाटील बंधुंची पांढरी शुभ्र सासनकाठी मंदिरात दाखल झाली. यावेळी गावोगावच्या मानकऱ्यांना मंदिरात निमंत्रित करण्यात आले. दोन वाजता धावडवाडीच्या मुस्लीम व विठलापूरच्या हिंदू मानकऱ्यांनी एकत्र नैवेद्य अर्पण केला. दुपारी दोन वाजेपर्यंत मोठी गर्दी झाली.

२.३० वाजता देवस्थानचे प्रमुख मानकरी माजी सभापती हर्षवर्धन देशमुख यांचे गावाच्या वेशीवर आगमन झाले. त्यांना धुपारतीसह मंदिरात पाचारण करण्यात आले.देवस्थानच्यावतीने सत्कार झाल्यावर त्यांच्याहस्ते पालखी पूजन व दर्शन झाल्यानंतर चांगभलंच्या जयघोषाने चिंचणी, तासगाव,जाधववाडी येथील मानकऱ्यांनी पालखी उचलून मुख्य सोहळयास सुरवात केली.

अग्रभागी मंदिरातील पुजारी धुपारती,सेवेकरी, मानकरी, भालदार, चोपदार अशा पारंपरिक व शाही थाटाचा लवाजम्याने पालखी सह प्रस्थान केले. नगारखाना प्रवेशद्वारातून पालखी तीन वाजता मुख्य पेठेत दाखल झाल्यावर भाविकांनी चांगभलंच्या गजरात गुलाल खोबऱ्याची एकच उधळण केली.

यावेळी मुख्य पेठेसह संपूर्ण आसमंत गुलाबी दिसत होता. मुख्य पेठेतून गुलाल खोबऱ्याची उधळण झेलत पालखी सोहळा जोगेश्वरी मंदिरात पोहोचला.तत्पूर्वी महादेव मंदीराच्या प्रांगणात सर्व सासनकाठया पालखीला टेकवून सलामी देण्यात आली. जोगेश्वरी मंदिरात पानसुपारी झाल्यानंतर प्रथेप्रमाणे टकऱ्या घडशी यांनी सासनकाठीला टक्कर दिली व पालखीचा परतीचा प्रवास सुरु झाला. यावेळी पालखीसोबत देवाच्यालोखंडी सासनकाठया होत्या.

चांगभलंच्या गजरात पालखी मुख्य मंदिरात पोहचल्यानंतर श्रीफळ वाढवण्यास सुरवात झाली. यात्रा शांततेत व सुरळीत पार पडण्यासाठी देवस्थान समिती,ग्रामपंचायत, बाजार समिती, महसूल व पोलीस प्रशासन, सेवेकरी व मानकरी यांनी परिश्रम घेतले.

यात्रेनिमित्त भरलेल्या जनावरांच्या बाजारात विक्रमी आवक झाली असून खरेदी विक्रीस सुरवात झाली आहे. जातीवंत खिलार जनावरांच्या शोधात शेतकरी व व्यापारी बाजारतळ धुंडाळून काढत आहेत. यात्रेनिमित्त आलेल्या व्यापारी वर्गास ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. यात्रेत विविध सामाजिक संस्था व व्यक्तींच्यावतीने पाणी पुरवठा व अन्नदानाचे नियोजन करण्यात आले होते.मंगळवारी दुपारी श्रींचा रथोत्सव होणार आहे.

खरसुंडी यात्रा आणि हिंदू मुस्लिम ऐक्य

खरसुंडी सिद्धनाथ मंदिरात हिंदू मुस्लीम ऐक्याची मोठी परंपरा जपली जाते. मुस्लिम बांधवांना लोणारी समाजातील बाड बांधवांसह लोखंडी सासनकाठीचा मान आहे. संपुर्ण मुस्लिम बांधव असलेल्या धावडवाडी गावाने लोकवर्गणीतून सिद्धनाथ मंदिर उभारले आहे. त्यामुळे हिंदू-मुस्लीम ऐक्य जोपासले जात आहे. पूर्वी सिद्धनाथ मंदिरातील कपडे खरसुंडीत मोहरम सणातील ताबुतासाठी वापरले जात. या सोहळ्यात हिंदू बांधवही सामील होत. कित्येक मुस्लीम बांधव आजही सिद्धनाथ चरणी नवस बोलत असतात. हिंदू-मुस्लिम ऐक्याचा हा आदर्श राज्यात आदर्शवत आहे.

आटपाडी आगारातून खरसुंडी, भिवघाट, सांगोला येथे जादा बस सोडण्यात आल्याने भाविकांची मोठी सोय झाली. मंदिरात आरोग्य विभागाने अत्यावश्यक सेवा म्हणून वैद्यकीय पथक ठेवले होते. मुख्य पेठेत घरावरून गुलाल खोबरे उधळण्यास पोलिसांनी मनाई केली होती.पोलिसांचा मोठा फौजफाटा यात्रा सुरक्षेसाठी तैनात करण्यात आला होता.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news