raju shetti 
सांगली

Shaktipeeth Highway| 'भामटे'च शक्तीपीठचे समर्थन करताहेत : माजी खा. राजू शेट्टी यांची जहरी टीका

शक्तीपीठ महामार्गात ५५ हजार कोटींचा घोटाळा

पुढारी वृत्तसेवा

विटा : ज्यांच्या मिशीला फडणवीसांचे जेवणाचे खरकटे लागले आहे, असेच नेते किंवा 'भामटे' या शक्तीपीठ महामार्गाचे समर्थन करत आहेत, अशा जहरी शब्दांत टीका करत या प्रकल्पात तब्बल ५५ हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार होत असल्याचा खळबळजनक आरोप शनिवारी (दि.६) माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला.

सांगली जिल्ह्यातील विट्यात शेतकऱ्यांचा एल्गार मेळावा झाला. शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यात "शेतकरी एकजुटीचा विजय असो" आणि "शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे" अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. प्रमुख वक्ते म्हणून माजी खासदार राजू शेट्टी बोलत होते. यावेळी ॲड. बाबासाहेब मुळीक, शिवसेना ठाकरे गटाचे युवासेना उपसचिव, वक्ते रणजीत बागल, श्रीरंग लाळे, गिरीश फुंडे, कडेगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. विजय महाडिक, ॲड. दीपक लाड, कॉम्रेड ॲड. सुभाष पाटील, गजानन सुतार, शिवदास होनमाने, गणेश शेवाळे माहुलीचे संग्राम देशमुख, महेश कुपाडे आदी प्रमुख उपस्थित होते.

माजी खासदार शेट्टी म्हणाले, आता समाजात दोनच पक्ष उरलेत एक शक्तीपीठाला विरोध करणारा प्रामाणिक शेतकऱ्यांचा पक्ष आणि दुसरा म्हणजे 'मिशीला खरकटा लागणाऱ्या भामट्यांचा पक्ष' जो केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी या प्रकल्पाचे समर्थन करत आहे. असे लोक स्वतः भ्रष्टाचाराचे पैसे खाऊन आता शेतकऱ्यांना या आंदोलनापासून किंवा मेळाव्यांपासून दूर राहण्यास सांगत आहेत. काहींच्या मागे 'ईडी' लावण्याची भीती आहे, तर काहींच्या वैयक्तिक 'सीडी' सरकार च्या ताब्यात आहेत, त्यामुळे हे लोक मिंधे झाले आहेत. शक्तीपीठ महामार्गाचे काम ज्या महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळा मार्फत आहे, ते खाते एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. ते गप्प आहेत, मात्र मुख्यमंत्री फडणवीस हे आपला ड्रीम प्रोजेक्ट आहे, असे सांगत सुटलेत. यामागचं गौड बंगाल काय ?असा सवाल करत मुख्यमंत्री फडणवीस हे हा प्रकल्प पोलीस बळाचा वापर करून पूर्ण करण्याचा अट्टहास करत आहेत. शेतकऱ्यांना त्यांच्या स्वतःच्या शेतातून गुंडांसारखे ओढून काढले जात आहे, जे लोकशाहीला काळिमा फासणारे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

केंद्र सरकारचा नाशिक-अक्कलकोट रस्ता प्रति किलोमीटर ५१ कोटी रुपयांत होत असताना राज्य सरकारचा शक्तीपीठ महामार्ग प्रति किलो मीटर ११७ कोटी रुपये खर्च दाखवून केला जात आहे. यातून ५५ हजार कोटींची लूट करण्याचे नियोजन असल्याचा आरोपही त्यांनी गणितासह मांडला. तसेच शासनाच्या एका जीआरनुसार पाचपट नव्हे तर केवळ दुप्पट रक्कमच शेतकऱ्यांना मिळणार आहे. सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाची 'अधिसूचना प्रसिद्ध झालेली नाही' असे लेखी उत्तर दिले असतानाही पोलीस बंदोबस्तात जमिनीची मोजणी का केली जात आहे, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

अधिसूचना नसल्यास कोणालाही शेतकऱ्यांच्या शेतात पाऊलही टाकू देऊ नका. कुठल्याच दृष्टीने शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांच्या हिताचा नाही. केवळ उद्योगपतींसाठी होत असलेल्या या महामार्गाला आमचा विरोध असून, शक्तिपीठाच्या नावाखाली शेतजमिनी संपादित करण्याचा प्रयत्न आम्ही सहन करणार नाही. शक्तिपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी येत्या ९ जून रोजी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले . तसेच रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत शक्तीपीठ महामार्गाला आम्ही विरोध करू, असेही शेट्टी यांनी यावेळी सांगितले.

ॲड. दीपक लाड म्हणाले, आमचा संघर्ष म्हणजे शेतकऱ्याच्या वेदनेचा एल्गार आहे. शेतकऱ्यांचा शक्तीपीठाला विरोध आहे. जनतेच्या भावना लक्षात घेऊन सरकारने शक्तिपीठ महामार्ग तात्काळ रद्द करावा. शेतकऱ्यांनी आता जागे झाले पाहिजे. महामार्गाला असलेला विरोध पाहता शासनाने बंदोबस्तासाठी पैसा आणि वेळ वाया न घालवता तसेच शेतकऱ्यांनाही अधिक खर्चात न पाडता शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा, अशी मागणी लाड यांनी केली. यावेळी डॉ. विजय महाडीक,रणजीत बागल, गिरीश फोंडे, ॲड. श्रीरंग लाळे, गजानन सुतार आदींची भाषणे झाली. ॲड. बाबासाहेब मुळीक यांनी आभार मानले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT