सुनील पाटील
ऐतवडे बुद्रुक : राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्यावतीने वाळवा तालुक्यात पहिल्यांदाच ए.आय. तंत्रज्ञानावर आधारित शेतीला सुरुवात केली आहे. पहिल्या टप्प्यात कारखान्यातर्फे 15 वेदर स्टेशन्स उभारण्यात आली आहेत. त्याचा फायदा पाच किलोमीटर परिसरातील शेतकऱ्यांना होणार आहे. हे तंत्रज्ञान वापरणारा राजारामबापू साखर कारखाना हा जिल्ह्यातील पहिला कारखाना ठरला आहे.
आ. जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांच्या कल्पकतेतून कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी ए.आय. वापरण्यास सुरुवात झाली आहे. कृषी विज्ञान केंद्र बारामती, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे आणि महाराष्ट्र शासन यांनी ए.आय.वर आधारित शेती करण्यास प्राधान्य दिले आहे. कारखाना कार्यक्षेत्रातील ऐतवडे बुद्रुक, साखराळे, मालेवाडी, गोटखिंडी, येडेनिपाणी, आष्टा, कारंदवाडी, कसबे डिग्रज, सावळवाडी, भाटवाडी, कासेगाव, बनेवाडी, कोरेगाव, बोरगाव अशा 15 गावांमध्ये हवामान स्थितीदर्शक स्वयंचलित उपकरण (वेदर स्टेशन) बसविण्यात आले आहे. यामध्ये प्रत्येक वेदर स्टेशनअंतर्गत पाच किलोमीटर अंतरावरील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
वेदर स्टेशन कार्यान्वित करण्यासाठी सुमारे 25 हजार रुपये खर्च येत आहे. यामध्ये 18 हजार 250 रुपये वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे, तर 6 हजार 750 रुपये साखर कारखान्यातर्फे देण्यात आले आहेत. याबाबत कारखान्याच्या माध्यमातून शेती अधिकारी प्रशांत पाटील हे मार्गदर्शन करत आहेत. ज्या शेतकऱ्यांना या तंत्रज्ञानावर आधारित शेती करायची आहे, त्यांनी कारखान्यावर नाव नोंदणी केल्यानंतर शेतकऱ्यांच्या शेतात सेन्सर बसविला जाईल. त्यानुसार त्यांनाही शेतीची स्थिती समजेल, अशी माहिती लाभार्थी प्रमोद गायकवाड यांनी दिली.