सांगली : कोल्हापूरला उच्च न्यायालयाचेे सर्किट बेंच मंजूर होण्यात दैनिक ‘पुढारी’चे योेगदान महत्त्वपूर्ण ठरले आहे, मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी दैनिक पुढारीच्या माध्यमातून सर्व प्रकारची मदत केली आहे, अशा प्रतिक्रिया सांगलीतील वकिलांनी व्यक्त केल्या. खंडपीठ कृती समितीच्यावतीने डॉ. प्रतापसिंह जाधव यांचा लवकरच सत्कार करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले.
महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचे माजी सदस्य श्रीकांत जाधव पत्रकार परिषदेत म्हणाले, ‘पुढारी’चे मुख्य संपादक प्रतापसिंह जाधव यांनी स्वतः तसेच दैनिक पुढारीच्या माध्यमातून कोल्हापूर खंडपीठासाठी सर्व प्रकारची मदत केली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री यांची भेट घडवून आणणे, शासनाकडे पाठपुरावा करणे, दैनिकाच्या माध्यमातून सहा जिल्ह्यांतील वकील, पक्षकार यांच्या व्यथा मांडणे अशा प्रकारचे काम केले. कोल्हापूर खंडपीठासाठी दैनिक पुढारीचे मोठे योगदान आहे. मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांचा खंडपीठ कृती समितीच्यावतीने लवकरच सत्कार करण्यात येणार आहे.
अॅड. जाधव म्हणाले, कोल्हापूर खंडपीठासाठी सहा जिल्ह्यांतील सर्व वकील पक्षकार व राजकीय पक्षांनी सक्रिय आंदोलन केले. सरन्यायाधीश व महाराष्ट्राचे सुपुत्र भूषण गवई यांनी मास्टर स्ट्रोक मारल्याने खंडपीठ झाले. गेल्या 40 वर्षांत किमान 40 वेळा बैठका झाल्या आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री व उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती यांच्यासमवेत अनेक बैठका झाल्या आहेत. अखेर सर्किट बेंचचा निर्णय झाल्याने न्याय मिळाला आहे.
लाखो पक्षकार वकिलांची अडचण लक्षात घेऊन त्यांची वेळ व पैशाची बचत होणार आहे. सहा जिल्ह्यांतील वकिलांना ज्यादा काम मिळणार आहे. पीडितांना कमी पैशात व जवळच्या ठिकाणी वेळेत न्याय मिळणार आहे.
छत्रपती शाहू महाराज यांनी गोरगरीब व उपेक्षित समाजाच्या प्रगतीसाठी आयुष्यभर प्रयत्न केले. त्या शाहू महाराजांच्या जन्मभूमीत समाजाच्या हितासाठी खंडपीठ देत असल्याचा अभिमान सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केला असल्याची माहिती अॅड. जाधव यांनी दिली.
वकील संघटनेचे अध्यक्ष अशोक वाघमोडे म्हणाले, सर्किट बेंचसाठी सरन्यायाधीश भूषण गवई, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती अलोक अराध्ये, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे सदस्य विवेक घाटगे, संग्राम देसाई, खंडपीठ कृती समितीचे अध्यक्ष व्ही. आर. पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सांगलीचे ज्येष्ठ वकील श्रीकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली खंडपीठासाठीच्या आंदोलनात जिल्ह्यातील वकील सहभागी झाले होते.
प्रमुख जिल्हा सरकारी वकील प्रमोद भोकरे म्हणाले, कोल्हापूर येथे होणार्या सर्किट बेंचमध्ये पाच ते सहा न्यायाधीश असतील. पूर्ण क्षमतेने हे न्यायालय सुरू होणार असल्याने लाखो पक्षकारांना वेळेत न्याय मिळणार आहे.
पत्रकार परिषदेस वकील संघटनेचे उपाध्यक्ष महावीर गायकवाड, माजी अध्यक्ष भाऊसाहेब पवार, सचिव दीपक कदम, सहसचिव शीतल मदवाने, शशिकला पाटील, प्रकाश पाटील, अमोल चिमण्णा, विक्रम पाटील, शिवाजी कांबळे उपस्थित होते.
सांगली, कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांसाठी कोल्हापूर येथे हायकोर्ट सर्किट बेंच मंजूर झाल्याबद्दल सांगली येथील वकिलांनी जल्लोष केला.
शनिवारी सकाळी दहा वाजल्यापासून वकील जिल्हा न्यायालय आवारात जमू लागले. साडेअकराच्या दरम्यान महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलचे माजी सदस्य व या लढ्यातील प्रमुख नेते अॅड. श्रीकांत जाधव यांचे आगमन होताच वकिलांनी त्यांचा फेटा बांधून सत्कार केला. यावेळी सरन्यायाधीश भूषण गवई यांचा जयघोष केला. त्यानंतर सांगली वकील संघटनेची तातडीची बैठक झाली. अॅड. श्रीकांत जाधव, प्रमुख जिल्हा सरकारी वकील प्रमोद भोकरे, वकील संघटनेचे अध्यक्ष अशोक वाघमोडे, उपाध्यक्ष महावीर गायकवाड, माजी अध्यक्ष भाऊसाहेब पवार, सविता शेडबाळे, किरण रजपूत, सुरेश भोसले, फारुख कोतवाल, माजी उपाध्यक्ष राजेंद्र माने यांची भाषणे झाली.
संघटनेचे अध्यक्ष अशोक वाघमोडे यांनी स्वागत केले, तर सहसचिव शीतल मदवाने यांनी आभार मानले. सचिव दीपक कदम, प्रकाश जाधव, अमित शिंदे, रोहिणी आपटे, विक्रांत वडेर, अमोल चिमण्णा, माजी सचिव अर्चना उबाळे, प्रवीण गोंधळे, सरकारी वकील शकील पखाली उपस्थित होते.
सरन्यायाधीश भूषण गवई, राज्याचे आजी-माजी मुख्यमंत्री व मंत्री, पत्रकार, पक्षकार व आंदोलनात सहभागी सर्वांच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला.