सांगली

सांगली : बोर्गी खुर्द येथे बोर नदीत पिकअप गेली वाहून; दोघे बचावले

अनुराधा कोरवी

जत ; पुढारी वृत्तसेवा : बोर्गी खुर्द (ता.जत) येथील बोर नदी पावसाच्या पाण्याने तुडूंब भरुन वाहत आहे. पाण्याचा ओघ (गती) जास्त असताना चालकाने पूलावरुन पिकअप चालवली आणि पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली. प्रसंगावधान राखत लोकांनी चालक आणि त्याच्या मित्राला नदीच्या प्रवाहातून बाहेर काढले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

याबाबत अधिक माहिती अशी की, पूर्व भागातील बोर्गी खुर्द येथील पिकअप मालक आणाप्पा तरनळ्ळी व त्याचा मित्र रियाज मुरशद हे दोघेजण पिकअपने करजगी येथील साहेबलाल देवाच्या उरुस यात्रेला निघाले होते. गावालगतच्या बोर नदीला गेली आठ दिवसापासून परतीचा पाऊस पडत असल्याने पाणी पुलावरुन वाहत आहे. या पूलाची उंची कमी आहे.

दरम्यान, आज शुक्रवारी दुपारी पावसाने हजेरी लावल्याने पाणी वाढले आहे. गाडी चालकानी पिकअप पूलावर मध्यभागी आल्यावर समोर येणारे दुचाकीला साइड देताना पाण्याच्या प्रवाहात पडली. पिकअपमध्ये बसलेले रियाज मुरशद यांनी गाडीच्या बाहेर उडी मारली. मात्र, चालक आणाप्पा तरनळ्ळी हे गाडीतच अडकून पडले. यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेऊन चालकाला मदत केली. गाडीचा दरवाजा काढून त्याला गाडीतून बाहेर काढले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.

बोर्गी खुर्द येथील पुलाची उंची वाढवावी. ही मागणी ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे. परंतु, याबाबत कोणतीही अद्याप कार्यवाही झाली नाही. या पुलावरुन विजापूर, गुड्डापूर, बेळोंडगी, संख या मुख्य गावाला जाण्याचा मार्ग आहे.

हेही वाचलंत का? 

SCROLL FOR NEXT